महाराष्ट्रात अवयव प्रत्यारोपणाला मोठे यश; १७,३२५ जिवंत व्यक्तींच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

0
35
महाराष्ट्रात अवयव प्रत्यारोपणाला मोठे यश; १७,३२५ जिवंत व्यक्तींच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
महाराष्ट्रात अवयव प्रत्यारोपणाला मोठे यश; १७,३२५ जिवंत व्यक्तींच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

महाराष्ट्रात अवयव प्रत्यारोपणाला मोठे यश; १७,३२५ जिवंत व्यक्तींच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

मरणोत्तर अवयवदानातून ३,३७३ रुग्णांना मिळाले नवजीवन; राज्यात अवयवदान प्रबोधन मोहीम राबविण्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्रात अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपणाच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षांत लक्षणीय प्रगती झाली आहे. राज्यात १९९५ पासून ऑक्टोबर २०२६ पर्यंत एकूण १७ हजार ३२५ जिवंत व्यक्तींमधील अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. यामध्ये १४ हजार ९४९ मूत्रपिंड (किडनी) आणि २ हजार ३७६ यकृत (लिव्हर) प्रत्यारोपणांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा लागू झाल्यानंतर तसेच २०११ आणि २०१४ मधील सुधारित कायद्यांनुसार अवयवदानाचा आलेख सातत्याने उंचावत आहे. या माध्यमातून हजारो गरजू रुग्णांना नवजीवन मिळाले आहे.
राज्य शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग, प्रादेशिक अवयव व उती प्रत्यारोपण समन्वय संस्था तसेच मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्रांच्या संयुक्त विद्यमाने विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. या प्रयत्नांमुळे राज्यभरात अवयवदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले.

मरणोत्तर अवयवदानातून ३,३७३ रुग्णांना नवजीवन

मरणोत्तर अवयवदानातून आतापर्यंत ३ हजार ३७३ गरजू रुग्णांना नवीन आयुष्य मिळाले आहे. यामध्ये १,८५३ मूत्रपिंड, ९८७ यकृत, २२० हृदय आणि ६३ फुफ्फुस प्रत्यारोपणांचा समावेश आहे. तसेच नेत्र व उतींसह अन्य २५० अवयवांचे यशस्वी रोपण करण्यात आले आहे.

विविध अवयवांसाठी हजारो रुग्ण प्रतीक्षेत

राज्यात सध्या विविध अवयवांच्या प्रत्यारोपणासाठी अनेक रुग्ण प्रतीक्षेत आहेत. त्यामध्ये—
अवयव प्रतीक्षेत असलेले रुग्ण
मूत्रपिंड ४,०७५
यकृत ८८८
हृदय ६३
फुफ्फुस २४
स्वादुपिंड १५
हात ११
लहान आतडे
या रुग्णांना वेळेत अवयव उपलब्ध होण्यासाठी नागरिकांनी अवयवदानाबाबत पुढाकार घेण्याची गरज आहे.

‘महाअवयवदान महोत्सवा’तून व्यापक जनजागृती

राज्यात अवयवदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी शासकीय पातळीवर ‘महाअवयवदान महोत्सव’ राबविण्यात आला. पथनाट्ये, चित्रपटगृहांमधील जाहिराती, आकाशवाणीवरील संदेश, परिसंवाद तसेच लघुपट प्रदर्शनाच्या माध्यमातून अवयवदानाबाबत जनजागृती करण्यात आली.
या सर्वसमावेशक प्रयत्नांमुळे अवयवदानाविषयी समाजात असलेले गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर होण्यास मदत झाली असून, राज्यात एका नव्या सामाजिक क्रांतीची सुरुवात झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
अवयवदानाबाबत नागरिकांमध्ये अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्यभर व्यापक अवयवदान प्रबोधन मोहीम राबविण्याचे आवाहनही आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here