एचआरडी अँटवर्पच्या मुंबईतील नवीन कार्यालयाचे बेल्जियमच्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
एचआरडी अँटवर्पच्या मुंबईतील नवीन कार्यालयाचे बेल्जियमच्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये नवीन कार्यालय; पंतप्रधान बार्ट डी वेव्हर यांनी घेतली हिऱ्यांच्या तपासणी व प्रमाणन प्रक्रियेची माहिती
मुंबई :
हिऱ्यांच्या प्रमाणपत्रासाठी अग्रगण्य असलेल्या एचआरडी अँटवर्पच्या मुंबईतील नवीन कार्यालयाचे उद्घाटन बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर यांच्या हस्ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे करण्यात आले.
यावेळी एचआरडी अँटवर्पचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॉल डी वॉख्टर आणि व्यवस्थापकीय संचालक रमाकांत मिटकर यांनी बेल्जियमच्या पंतप्रधानांचे स्वागत केले. यावेळी उपस्थित शिष्टमंडळात रवी भन्साळी, चिराग शाह आणि मायकेल गिल्हान्ड डी मर्झेम यांचा समावेश होता.
नवीन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान बार्ट डी वेव्हर यांनी, “हिरा जसा चमकतो, तसा राष्ट्रांमधील विश्वासही चिरंतन राहतो,” असे प्रतिपादन केले. भारत आणि बेल्जियम यांच्यातील हिऱ्यांच्या व्यापार क्षेत्रातील संबंध आणि परस्पर विश्वासाचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.
उद्घाटनानंतर पंतप्रधान वेव्हर यांनी एचआरडी अँटवर्पच्या हिऱ्यांची तपासणी व प्रमाणन प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. त्यांनी सूक्ष्मदर्शकातून हिऱ्याची पाहणी करताना त्याचा कट, रंग, स्वच्छता आणि कॅरेट यांसह हिऱ्यावर करण्यात येणाऱ्या लेझर मार्किंगची प्रक्रियाही समजून घेतली.
हिरा खरेदी करताना ग्राहकांनी त्याचे प्रमाणपत्र आणि गुणवत्ता तपासणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे एचआरडी अँटवर्पचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॉल डी वॉख्टर यांनी सांगितले. प्रमाणित हिऱ्यामुळे ग्राहकांना त्याच्या गुणवत्तेबाबत अधिक विश्वासार्ह माहिती मिळण्यास मदत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.