बजाज फिनसर्व्हचे आधुनिक मुख्यालय पुण्याच्या विकासाला नवी दिशा देईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बजाज फिनसर्व्हचे आधुनिक मुख्यालय पुण्याच्या विकासाला नवी दिशा देईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुण्यात प्रस्तावित मुख्यालयाचे भूमिपूजन; पुढील तीन-चार वर्षांत शहराची ओळख वेगवान वाहतूक व्यवस्था असलेले आधुनिक शहर म्हणून निर्माण करण्याचा निर्धार
पुणे :
बजाज फिनसर्व्हच्या माध्यमातून पुण्यात उभारण्यात येणारे आधुनिक आणि शाश्वत सुविधांनी युक्त मुख्यालय शहराच्या विकासाला नवी दिशा देणारे ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पुण्याला देशातील आधुनिक आणि वेगवान मोबिलिटी असलेले शहर म्हणून विकसित करण्यासाठी शासनाकडून आवश्यक पायाभूत सुविधा वेगाने उभारण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
पुणे येथे बजाज फिनसर्व्हच्या प्रस्तावित मुख्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज, बजाज फिनसर्व्ह सीएसआरच्या अध्यक्षा शेफाली बजाज, बजाज फायनान्सचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव जैन, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह बजाज समूहातील पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वेगवान वाहतूक व्यवस्थेसह आधुनिक पुण्याचा संकल्प
पुढील तीन ते चार वर्षांत पुण्याची ओळख वेगवान वाहतूक व्यवस्था असलेले शहर म्हणून निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. आधुनिक शहर म्हणून पुण्याची ओळख अधिक दृढ करायची असून, या दिशेने बजाज फिनसर्व्हचा आधुनिक परिसर महत्त्वाची भूमिका बजावेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
पुणे आणि मुंबई ही शहरे देशातील फिनटेक इकोसिस्टीमची महत्त्वाची केंद्रे बनली आहेत. पहिल्या तिमाहीत मुंबईने बंगळुरुला मागे टाकले असून, एकूण फिनटेक गुंतवणुकीपैकी ६१ टक्के गुंतवणूक मुंबईत झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
फिनटेक स्टार्टअप क्षेत्रातही मोठी वाढ झाली असून, या क्षेत्रात ५९ टक्के वाढ आणि ९०० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक झाल्याचे त्यांनी सांगितले. फिनटेकची ही इकोसिस्टीम नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरपर्यंत विस्तारण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नागपुरातही बजाज फिनसर्व्हची सेवा सुरू होण्याची अपेक्षा
लवकरच नागपूरमध्येही बजाज फिनसर्व्हची सेवा सुरू झालेली पाहायला मिळेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली. फिनटेक क्षेत्राचा विस्तार राज्यातील विविध शहरांमध्ये झाल्यास रोजगार, गुंतवणूक आणि आर्थिक विकासाला चालना मिळण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
पुण्याच्या ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेला बळ मिळणार
बजाज समूहाचा शंभर वर्षांचा वारसा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची दूरदृष्टी यांचा सुंदर संगम बजाज फिनसर्व्हच्या नव्या कॅम्पसमध्ये पाहायला मिळणार आहे. हा कॅम्पस पुण्याच्या ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेला अधिक बळ देणारा ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला.
पुण्यात आधुनिक पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि उद्योगक्षेत्राचा विस्तार होत असताना बजाज फिनसर्व्हच्या या प्रस्तावित मुख्यालयामुळे शहराच्या आर्थिक आणि कॉर्पोरेट विकासाला आणखी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.