सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्र देशात अव्वल
सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्र देशात अव्वल
PMFME योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीची राष्ट्रीय पातळीवर दखल; ३१,७४६ प्रकल्पांना मंजुरी, १७,७८६ प्रकल्प महिला उद्योजकांचे
नवी दिल्ली : ‘
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना’ (PMFME) प्रभावीपणे राबविण्यात महाराष्ट्राने देशातील मोठ्या राज्यांच्या श्रेणीत अव्वल क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नवी दिल्ली येथे आयोजित समारंभात केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला.
३१ हजारांहून अधिक प्रकल्पांना मंजुरी
PMFME योजनेअंतर्गत २०२१-२२ पासून महाराष्ट्रात आतापर्यंत ३१ हजार ७४६ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेमुळे राज्यातील सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना चालना मिळण्याबरोबरच शेतमालाच्या मूल्यवर्धनाला आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळाले आहे.
५६ टक्के प्रकल्प महिला उद्योजकांचे
योजनेच्या माध्यमातून महिला उद्योजकतेलाही मोठी चालना मिळाली आहे. मंजूर झालेल्या प्रकल्पांपैकी १७ हजार ७८६ म्हणजेच ५६ टक्के प्रकल्प महिला उद्योजकांचे आहेत. त्यामुळे ग्रामीण व निमशहरी भागातील महिलांना स्वतःचा उद्योग उभारण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
३,९३५ कोटींची गुंतवणूक; १०.५६ लाख मनुष्यदिन रोजगार
PMFME योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात आतापर्यंत ३,९३५ कोटी रुपयांची एकूण गुंतवणूक झाली आहे. तसेच १०.५६ लाख मनुष्यदिन रोजगार निर्माण झाला असून, त्यामध्ये २.६४ लाख प्रत्यक्ष आणि ७.९२ लाख अप्रत्यक्ष रोजगाराचा समावेश आहे.
या योजनेमुळे शेतमालाला स्थानिक पातळीवर प्रक्रिया करून अधिक मूल्य मिळविण्याची संधी निर्माण झाली असून, ग्रामीण भागात रोजगार आणि उद्योगनिर्मितीला चालना मिळत आहे.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा गौरव
योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल छत्रपती संभाजीनगरचे दीपक गवळी, अहिल्यानगरचे सुधाकर बोराळे तसेच सर्वाधिक प्रकल्प मंजूर करणारे जिल्हा संसाधन व्यक्ती पवन काबरा यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
दरम्यान, राष्ट्रीय ग्रामीण व शहरी उपजीविका अभियानाच्या अंमलबजावणीतही महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान मिळवून आपली आघाडी कायम ठेवली आहे. या कार्यक्रमास कृषी प्रक्रिया व नियोजन विभागाचे संचालक विनायक कुमार आवटे आणि राज्य प्रकल्प व्यवस्थापक अमोल चिद्रावार उपस्थित होते.
शेतमालाचे मूल्यवर्धन, ग्रामीण रोजगारनिर्मिती आणि महिला उद्योजकतेला बळ देणाऱ्या या उपक्रमाच्या यशाबद्दल राज्यातील शेतकरी बांधव तसेच कृषी यंत्रणेचे अभिनंदन करण्यात आले.