कोमसाप दापोली आयोजित ‘श्रावणधारा’त काव्यरसिक ओलेचिंब!

0
31
कोमसाप दापोली आयोजित ‘श्रावणधारा’त काव्यरसिक ओलेचिंब!
कोमसाप दापोली आयोजित ‘श्रावणधारा’त काव्यरसिक ओलेचिंब!

कोमसाप दापोली आयोजित ‘श्रावणधारा’त काव्यरसिक ओलेचिंब!

२१ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; नमस्या पतंगे प्रथम, मैथिली कालेकर द्वितीय

दापोली प्रतिनिधी : अरविंद मांडवकर
श्रावणाच्या सरींसोबत शब्दांच्या आणि भावनांच्या काव्यधारा बरसवत कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा दापोली आयोजित ‘श्रावणधारा’ कवीसंमेलन नुकतेच ए.जी. हायस्कूल दापोली येथील माधव कोकणे सभागृहात उत्साहात संपन्न झाले. निमंत्रित कवींसह विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वरचित कवितांनी सभागृहातील शेकडो काव्यरसिक अक्षरशः ओलेचिंब झाले.

कोमसाप दापोलीचे अध्यक्ष चेतन राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कवीसंमेलनाच्या व्यासपीठावर सचिव- बाबू घाडीगांवकर, सहसचिव-अरविंद मांडवकर, उपाध्यक्ष- प्रा. कुणाल मंडलीक, सुनील कदम, ए.जी. हायस्कूलचे प्राचार्य शरद कांबळे, मुख्याध्यापक एस. आय. मगदूम, सोनाली मेहंदी, मानसी अभ्यंकर, प्रा. कैलास गांधी, सुदेश मालवणकर, रेखा जेगरकल, जयवंत चव्हाण, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे रविंद्र कालेकर, राजेश पवार, श्रेया भावे आदी मान्यवर उपस्थित होते.
दीपप्रज्वलन व शारदा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कोमसाप दापोलीचे सचिव बाबू घाडीगांवकर यांनी प्रास्ताविकातून ‘श्रावणधारा ’ कवीसंमेलनामागील भूमिका स्पष्ट केली. निमंत्रित कवी प्रा. कैलास गांधी, सुनील कदम आणि जयवंत चव्हाण यांनी आपल्या स्वरचित काव्यरचनांचे प्रभावी सादरीकरण करत रसिकांची दाद मिळवली.
या कवीसंमेलनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ए.जी. हायस्कूल दापोलीच्या कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली स्वरचित काव्यवाचन स्पर्धा. या स्पर्धेत तब्बल २१ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या काव्यप्रतिभेचे दर्शन घडविले. विद्यार्थ्यांच्या एकाहून एक सरस काव्यरचनांनी सभागृहात साहित्यिक वातावरण निर्माण केले.
स्पर्धेत कु. नमस्या अभिजित पतंगे हिने प्रथम, कु. मैथिली मंदार कालेकर हिने द्वितीय, तर कु. आर्या मंगेश गावडे हिने तृतीय क्रमांक पटकावला. कु. सौम्या विजय आंजर्लेकर आणि कु. सिया सिताराम जागडे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, भेटवस्तू व आकर्षक प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सहभागी सर्व कवींनाही भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
काव्यवाचन स्पर्धेचे परीक्षण रेखा जेगरकल व सुदेश मालवणकर यांनी केले. यावेळी परीक्षक सुदेश मालवणकर यांनी ‘काव्यलेखन – तंत्र आणि मंत्र ’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
संपूर्ण कवीसंमेलनाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. कुणाल मंडलीक यांनी केले, तर श्रेया भावे यांनी आभार मानले. श्रावणातील निसर्गसौंदर्य, मानवी भावना आणि काव्यप्रतिभेचा सुरेख संगम घडविणारे हे कवीसंमेलन दापोलीतील साहित्यरसिकांसाठी संस्मरणीय ठरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here