जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे विद्यार्थ्यांमध्ये रमल्या; शिक्षक दिनी आडाळी शाळेला भेट
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे विद्यार्थ्यांमध्ये रमल्या; शिक्षक दिनी आडाळी शाळेला भेट
विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या कलागुणांचे कौतुक; मुलांसोबत नृत्य करत अनुभवले आनंदाचे क्षण
दोडामार्ग :
५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दोडामार्ग तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १, आडाळी येथे विद्यार्थ्यांसोबत आनंदाचे क्षण अनुभवले. विद्यार्थ्यांमध्ये अगदी मिसळून त्यांच्या अभ्यासासह विविध कौशल्ये आणि कलागुणांचे कौतुक करत जिल्हाधिकाऱ्यांनी मुलांसोबत नृत्यही केले.
विद्यार्थ्यांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची तसेच विविध कौशल्यांची माहिती जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी जाणून घेतली. मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देतानाच त्यांच्या उत्साहात सहभागी होत त्यांनी विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले.
‘मराठी शाळा म्हणजे संस्कारांचे केंद्र’
मराठी शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून संस्कार, मूल्ये आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची पायाभरणी करणारे सकारात्मक ऊर्जेचे केंद्र आहे, हा संदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या या भेटीतून अधोरेखित झाला.
विद्यार्थ्यांच्या आनंदात सहभागी होत त्यांना प्रोत्साहन देणारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची ही संवेदनशील आणि प्रेरणादायी कृती शिक्षक, पालक तसेच विद्यार्थ्यांसाठी विशेष ठरली. शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मिळालेला हा आनंददायी अनुभव त्यांच्या स्मरणात राहणारा ठरला.ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांमध्ये संस्कारांची पेरणी करणाऱ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच जिल्ह्यातील सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.