ठाणे जिल्ह्यातील पाच शिक्षकांचा ‘जिल्हा आदर्श शिक्षक’ पुरस्काराने गौरव
ठाणे जिल्ह्यातील पाच शिक्षकांचा ‘जिल्हा आदर्श शिक्षक’ पुरस्काराने गौरव
ठाणे :
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला नवी दिशा देत, त्यांच्या जिज्ञासा, आत्मविश्वास आणि सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील पाच शिक्षकांचा ‘जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२६-२७’ देऊन गौरव करण्यात आला. जिल्हा परिषद, ठाणेच्या शिक्षण विभागामार्फत आयोजित या पुरस्कार सोहळ्यात शिक्षकांच्या शैक्षणिक कार्याचा सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, त्यांच्यामध्ये जिज्ञासा व आत्मविश्वास निर्माण करणे, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे, शिष्यवृत्ती तसेच स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना योग्य दिशा देत गुणवत्तापूर्ण आणि विद्यार्थी-केंद्रित शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
यंदाच्या पुरस्कारांतर्गत अंबरनाथ तालुक्यातील जि. प. शाळा मामूची वाडी, केंद्र पिंपळोळी येथील प्राथमिक शिक्षिका छाया संजय कोकंदे, भिवंडी तालुक्यातील जि. प. शाळा देवरुंग, केंद्र शिवनगर येथील पदवीधर शिक्षक सुभाष गोविंद पाटील, कल्याण तालुक्यातील जि. प. शाळा घोटसई, केंद्र गोवेली येथील प्राथमिक शिक्षिका रंजना प्रकाश टेंभे, मुरबाड तालुक्यातील जि. प. शाळा खेडले तळवली, केंद्र खेवारे महाज येथील प्राथमिक शिक्षक तानाजी धर्मा जाधव तसेच शहापूर तालुक्यातील जि. प. शाळा कळगाव, केंद्र दहिवली येथील पदवीधर शिक्षक वैभव गणपत मांजे यांचा आदर्श शिक्षक म्हणून सन्मान करण्यात आला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी, त्यांच्या मनात जिज्ञासा आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या शिक्षकांनी केलेले कार्य प्रेरणादायी ठरले आहे.