जागतिक विखंडनाच्या काळात सर्वांना एकत्र आणणाऱ्या व्यासपीठाची गरज : मुख्यमंत्री फडणवीस
जागतिक विखंडनाच्या काळात सर्वांना एकत्र आणणाऱ्या व्यासपीठाची गरज : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : जग मोठ्या विखंडनाच्या अवस्थेतून जात असताना राजकीय आणि आर्थिक संवादासोबतच संस्कृती, विचार आणि सामाजिक मूल्यांची देवाणघेवाण घडवून आणणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबईत आयोजित **‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम २०२६ आवृत्ती २’**च्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. भगवान श्रीकृष्णाने सर्वसमावेशकता, नैतिकता आणि सत्याच्या विजयाचा संदेश दिला आहे. आजच्या जागतिक परिस्थितीत सर्वांना एकत्र आणण्यासाठी अशाच विचारांची आणि संवादाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
भारताच्या प्राचीन ‘वसुधैव कुटुंबकम्’ या संकल्पनेचा संदर्भ देताना मुख्यमंत्री म्हणाले की, प्राचीन काळात जागतिक व्यापारात भारताचा वाटा सुमारे ३५ टक्के होता. भारताने केवळ वस्तूंची निर्यात केली नाही, तर जगाला उदात्त विचारही दिले. बौद्ध धर्माचा विविध देशांमध्ये झालेला प्रसार हे त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.
ब्रिक्स आणि ब्रिक्स प्लस यांसारख्या संघटना ग्लोबल साउथ अर्थात विकसनशील देशांच्या आकांक्षांचे प्रतिनिधित्व करतात. बहुध्रुवीयता आणि विविधता ही निसर्गाची देणगी असून, या विविधतेचा आदर व जतन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची मोठी आवश्यकता आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मुंबईचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले की, मुंबई ही देशाची आर्थिक, व्यावसायिक, मनोरंजन आणि फिनटेक राजधानी आहे. विविध संस्कृतींना सामावून घेणाऱ्या मुंबईत भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ही दिसून येते. त्यामुळे ‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम’च्या दुसऱ्या आवृत्तीच्या आयोजनासाठी मुंबई हे अत्यंत योग्य ठिकाण आहे, असे त्यांनी सांगितले.
या फोरमच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. पुढील दोन दिवसांत आर्थिक सहकार्यासोबतच कला, क्रीडा, संगीत आणि संस्कृती या क्षेत्रांतही मोठ्या प्रमाणावर विचार व अनुभवांची देवाणघेवाण होणार आहे. या माध्यमातून आंतरराष्ट्रीय सहकार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.या उद्घाटन सोहळ्यास ब्राझीलचे महावाणिज्यदूत जोस मौरो, रशियाचे महावाणिज्यदूत इव्हान फेटिसोव्ह, चीनचे महावाणिज्यदूत किन जी, दक्षिण आफ्रिकेचे महावाणिज्यदूत जी. ई. लॅबेन यांच्यासह विविध देशांचे प्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते.