ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १ येथील रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद
ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १ येथील रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद
ठाणे (विश्वनाथ पंडित) —
क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थेच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त संस्था अध्यक्ष ॲड. राजन पवार व सचिव अविनाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, वैद्यकीय विभागाचे अध्यक्ष तानाजी पवार यांच्या संकल्पनेतून तसेच छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल, कळवा, ठाणे यांच्या सहकार्याने ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
ठाणे रेल्वे स्थानक व्यवस्थापक व अधिकारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि संस्थेच्या कुलदैवत श्री गडकालिका माता यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी संस्थेचे सचिव अविनाश पवार यांनी तब्बल ६०व्यांदा, तर अमित भरत पवार यांनी २५व्यांदा रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. संस्थेच्या प्रत्येक रक्तदान शिबिरात नियमितपणे सहभागी होणाऱ्या सौ. मानसी महेश पवार यांनीही यावेळी रक्तदान करून आपला सामाजिक सहभाग कायम ठेवला.
रक्तदानासोबतच महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत चाळीस वर्षाखालील तरुण तरुणांसाठी सिकल सेल तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे रक्तदानासोबतच आरोग्यविषयक जनजागृतीलाही चालना मिळाली.
या शिबिरास संस्थेचे विश्वस्त, पदाधिकारी, सभासद, हितचिंतक तसेच नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.