मालवणच्या प्राप्ती सावंतचे नेदरलँड्समधील ट्वेंटे विद्यापीठात विक्रमी यश
मालवणच्या प्राप्ती सावंतचे नेदरलँड्समधील ट्वेंटे विद्यापीठात विक्रमी यश
मालवणच्या प्राप्ती सावंतचे नेदरलँड्समध्ये विक्रमी यश ट्वेऺटे विद्यापीठात (University of Twente) ९.६ गुण; पृथ्वीविज्ञानासाठी उपयोजित दूरसंवेदनात सर्वोच्च स्थान
मालवण, प्रतिनिधी :
मालवणच्या कु. प्राप्ती प्रसाद सावंत हिने नेदरलँड्समधील ट्वेंटे विद्यापीठात (University of Twente) भू-माहिती विज्ञान आणि पृथ्वी निरीक्षण (Geo-Information Science and Earth Observation) या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात ९.६ गुण मिळवत विक्रमी यश संपादन केले आहे. पृथ्वीविज्ञानासाठी उपयोजित दूरसंवेदन (Applied Remote Sensing for Earth Sciences) या विशेष विषयात तिने विद्यापीठात सर्वोच्च स्थान मिळवले. या यशानंतर प्राप्तीला नासा (NASA) तसेच अन्य अंतराळ संशोधन संस्थांकडून थेट नोकरीची ऑफर्स मिळाली आहे.
प्राप्तीने नुकताच दोन वर्षांचा हा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला. विद्यापीठातील आतापर्यंतचा ९.२ गुणांचा विक्रम मोडत तिने ९.६ गुण मिळवले.
तिने ‘झुइडवाल गुरुत्वीय-चुंबकीय विसंगतीचे द्विमितीय प्रतिमान प्रक्रियेद्वारे मूल्यमापन’ (Evaluating the Zuidwal Gravity-Magnetic Anomaly Through 2D Forward Modelling Constrained by Model-Based Seismic Depth Horizons) या विषयावर प्रबंध सादर केला.
प्राप्ती ही मूळची सिंधुदुर्ग जिल्हातील मालवणची असून कुणकवळे हे तिचे मूळ गाव आहे. मालवण येथील रोझरी इंग्रजी माध्यम शाळेत चौथीपर्यंत तिचे शिक्षण झाले. त्यानंतर पुण्यातील भारती विद्यापीठात तिने पुढील शिक्षण घेतले. अकरावी आणि बारावीचे शिक्षण पुण्यातील जाधवार महाविद्यालयात झाले.
प्राप्तीची आई कॅनडातील टोरोंटो विद्यापीठात प्राध्यापक असून त्यांनी तेथेच पीएच.डी. (Ph.D.) पूर्ण केली आहे.
भविष्यात अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात पीएच.डी. करण्याची तिची इच्छा आहे. लहानपणापासूनच तिला अंतराळाशी संबंधित विषयांमध्ये रस असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.