ऑस्ट्रेलियन जावयाने जेजुरीच्या खंडोबाचा केला कुलधर्म-कुलाचार !

0
33
ऑस्ट्रेलियन जावयाने जेजुरीच्या खंडोबाचा केला कुलधर्म-कुलाचार !
ऑस्ट्रेलियन जावयाने जेजुरीच्या खंडोबाचा केला कुलधर्म-कुलाचार !

ऑस्ट्रेलियन जावयाने जेजुरीच्या खंडोबाचा केला कुलधर्म-कुलाचार !

सासू-सासऱ्यांनी विदेशी जावयाला घडवली मल्हारवारी; तळी-भंडारा भरून ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा केला जयघोष

जेजुरी :
भारतीय लोकदैवत आणि महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा मल्हारी मार्तंड देवाच्या दर्शनासाठी पिढ्यान्‌पिढ्या येणाऱ्या भोईर परिवाराने आपल्या ऑस्ट्रेलियन जावयासह त्याच्या परिवाराला जेजुरी गडावर आणून पारंपरिक पद्धतीने कुलधर्म-कुलाचार केला. या वेळी ऑस्ट्रेलियन जावयाने तळी-भंडारा भरून भंडाऱ्याची उधळण करत महाराष्ट्राच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचा अनुभव घेतला.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात राहणारे प्रदीप भोईर आणि त्यांच्या पत्नी गीता यांच्या कन्या कौशिकी यांचा ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्यातील मेलबर्न शहरातील युवक कोरी पाल्मर यांच्याशी प्रेमविवाह झाला. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने हा विवाह आनंदात पार पडला. भोईर परिवाराची जेजुरीच्या खंडोबाला कुलधर्म-कुलाचार करण्याची परंपरा असल्याने त्यांनी आपल्या विदेशी जावयाला सोबत घेऊन जेजुरी गड गाठला.
भोईर परिवाराचे घराण्याचे पुजारी महेश महासकांता आगलावे यांनी पारंपरिक पद्धतीने त्यांचा कुलधर्म-कुलाचार विधी पूर्ण करून घेतला. जेजुरगडावरील परंपरेनुसार नवविवाहित वराने आपल्या नववधूला कडेवर घेऊन गडाच्या पायऱ्या चढण्याची प्रथा आहे. ही प्रथाही ऑस्ट्रेलियन जावई कोरी पाल्मर यांनी मोठ्या आनंदाने पार पाडली.
कुलधर्म-कुलाचाराच्या वेळी त्यांनी तळी-भंडारा भरला आणि खंडोबाच्या चरणी भंडारा अर्पण करून त्याची उधळण केली. यावेळी ‘येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट’ असा जयघोष करण्यात आला. महाराष्ट्राच्या या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेबद्दल कोरी पाल्मर यांनी अभिमान व्यक्त केला.
जेजुरीच्या मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी, ‘पिवळ्या भंडाऱ्याने नटलेले जेजुरीचे हे मंदिर पाहून मन प्रसन्न झाले. भारत हा सुंदर देश असून हे कुलधर्म-कुलाचाराचे मंदिर एक पवित्र भूमी आहे,’ अशी भावना व्यक्त केली.
जेजुरीचा खंडोबा केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-विदेशातही लोकप्रिय आहे. रशिया, फ्रान्स, बेल्जियम, अमेरिका, इंग्लंड, मॉरिशस यांसह विविध देशांमधून पर्यटक आणि भाविक जेजुरीला भेट देत असतात. जर्मनीतील प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ कै. डॉ. गुंथर सोनथायमर यांनीही खंडोबाच्या परंपरा आणि लोकसंस्कृतीवर अभ्यास करून त्यावर संशोधनपर लेखन केले आहे.
अठरा पगड जाती-धर्मांचे श्रद्धास्थान असलेला खंडोबा हा भारतीय लोकसंस्कृतीतील महत्त्वाचा लोकदैवत मानला जातो. महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांचे कुलदैवत असलेल्या मल्हारी मार्तंडाच्या कुलधर्म-कुलाचाराची परंपरा आता देशाच्या सीमा ओलांडून परदेशी कुटुंबांपर्यंत पोहोचत असल्याचे भोईर परिवाराच्या या उपक्रमातून दिसून आले.
जेजुरीच्या पवित्र भूमीतून उधळला जाणारा मल्हारीचा पिवळा भंडारा आणि ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष आता जागतिक सांस्कृतिक ओळखीचा भाग बनत असल्याचे या अनोख्या सोहळ्याने अधोरेखित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here