विजयकुमार हरिश्चंद्रे यांना ‘आदर्श पत्रकार’ पुरस्कार
विजयकुमार हरिश्चंद्रे यांना ‘आदर्श पत्रकार’ पुरस्कार
जेजुरी नगर परिषदेच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त गौरव
जेजुरी :
भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त जेजुरी नगर परिषदेच्या वतीने सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, पर्यावरणीय आणि निसर्गविषयक लेखन तसेच वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रणातून उल्लेखनीय ठसा उमटविणारे जेजुरी येथील पत्रकार विजयकुमार हरिश्चंद्रे यांना ‘आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
जेजुरी येथील पालखी मैदानावर आयोजित स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमात जेजुरीचे नगराध्यक्ष जयदीप भैय्या बारभाई आणि नगर परिषदेचे प्रशासकीय मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांच्या हस्ते हरिश्चंद्रे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी उपनगराध्यक्ष गणेश निकुडे, प्राचार्य नंदकुमार सागर, डॉ. अनिल कदम, नगरसेवक किसन कुदळे, योगेश जगताप, अभिजीत कुदळे, रमेश लेंडे, माजी नगराध्यक्ष साधनाताई दिडभाई, माजी नगराध्यक्ष रोहिदास कुंभार, नगरसेविका मोनिका गाडगे, नीलम सातभाई, स्वरूपा खोमणे, पूजा कोरफड, स्नेहल भालेराव, सत्यवान दादा उबाळे, सुशील राऊत, मंदाताई बयास, शिवाजी जगताप, कार्यकर्ते राहुल गाडगे तसेच ज्येष्ठ पत्रकार शिवराज झगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पत्रकार विजयकुमार हरिश्चंद्रे यांनी केवळ जेजुरीपुरते मर्यादित न राहता महाराष्ट्रातील सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक, राजकीय, निसर्ग आणि पर्यावरणविषयक विविध घडामोडींवर विपुल लेखन केले आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रणाच्या माध्यमातूनही त्यांनी जेजुरीसह महाराष्ट्रातील विविध पैलूंना व्यापक व्यासपीठ मिळवून दिले आहे. राज्यातील विविध नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांच्या लेखणीचा ठसा उमटला आहे.
पत्रकारितेबरोबरच मराठी चित्रपटसृष्टीतही त्यांनी अभिनय, दिग्दर्शन आणि कॅमेरामन अशा विविध क्षेत्रांत बहुरंगी भूमिका बजावल्या आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना यापूर्वीही राज्यातील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यंदा त्यांच्या मातृभूमीतील हा महत्त्वाचा आणि मानाचा पुरस्कार जेजुरी नगर परिषदेच्या वतीने प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे, हरिश्चंद्रे यांनी जेजुरी नगरपालिकेचे स्वच्छता सदिच्छा दूत म्हणूनही काम केले आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त जेजुरी पंचक्रोशीतील विविध सामाजिक संस्था, मंडळे, प्रतिष्ठाने, अध्यक्ष, कार्यकर्ते, महाविद्यालये, जिल्हा परिषद शाळांचे शिक्षकवृंद आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरस्काराबद्दल भावना व्यक्त करताना पत्रकार विजयकुमार हरिश्चंद्रे म्हणाले, ‘३२ वर्षांच्या पत्रकारितेच्या प्रवासात सामाजिक आणि राजकीय जीवनाचे अनेक कंगोरे अनुभवता आले. हा सन्मान माझा नसून संपूर्ण जेजुरीचा सन्मान आहे.’