पर्यावरण संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याच्या सामाजिक बांधिलकीतून श्रीमान मथुरभाई बुटाला हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, गावतळे येथे अश्विनी अँग्रो फार्म आणि कुणबी सेवा संघ, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने ३१५ विविध वृक्षरोपांचे मोफत वाटप करण्यात आले. यामध्ये चिकू, पेरू, कोकम, लिंबू, पाम आदी विविध प्रकारच्या रोपांचा समावेश होता.
वाढत्या नैसर्गिक आपत्ती आणि पर्यावरणीय समस्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच निसर्गाविषयी संवेदनशीलता निर्माण होणे गरजेचे आहे. ‘वृक्ष लागवड ही केवळ मोहीम नसून भावी पिढीच्या सुरक्षित भविष्यासाठीची जबाबदारी आहे,’ या भावनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी नवभारत छात्रालय परिवाराचे अध्यक्ष प्रमोद सावंत यांनी वृक्षांची जोपासना ही काळाची गरज असल्याचे सांगितले. दिवसेंदिवस झाडांची संख्या कमी होत असताना प्रत्येकाने वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
कुणबी सेवा संघ, दापोलीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी वृक्षलागवडीचा उद्देश स्पष्ट करत संस्थेच्या वृक्षलागवड व पर्यावरण संवर्धनाच्या कार्याची माहिती दिली. तसेच वृक्षांपासून पर्यावरणीय लाभाबरोबरच योग्य नियोजनातून आर्थिक उत्पन्नाचे साधनही निर्माण करता येते, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्राचार्या भक्ती सावंत यांनी विद्यार्थ्यांमध्ये बालवयापासूनच वृक्षसंवर्धनाची जागृती निर्माण करणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले. मानवाच्या पर्यावरणातील वाढत्या अतिक्रमणामुळे अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण होत असून, त्यावर वृक्षलागवड व संवर्धन हा प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांना शास्त्रीय पद्धतीने वृक्षलागवड कशी करावी, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. मोफत मिळालेल्या रोपांची योग्य पद्धतीने लागवड करून त्यांची नियमित जोपासना करण्याचे आवाहनही करण्यात आले.
कार्यक्रमास नवभारत छात्रालय परिवार सदस्य प्रभाकर तेरेकर, कुणबी सेवा संघ दापोलीचे सचिव हरिश्चंद्र कोकमकर, पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. एल. कालेकर यांनी केले.
🌳 ३१५ रोपे वाटप; विद्यार्थ्यांच्या हाती निसर्ग संवर्धनाची जबाबदारी!