‘अमृत’तर्फे ११ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘विश्वबंधुत्व पंधरवडा’

0
19

‘अमृत’तर्फे ११ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘विश्वबंधुत्व पंधरवडा’

स्वामी विवेकानंदांच्या शिकागो भाषणातील सर्वधर्मसमभाव, सहिष्णुता आणि विश्वबंधुत्वाचा विचार जनमानसात रुजविण्यासाठी विविध उपक्रम

मुंबई :
स्वामी विवेकानंद यांच्या ऐतिहासिक शिकागो भाषणातील सर्वधर्मसमभाव, सहिष्णुता आणि विश्वबंधुत्वाचा विचार समाजात रुजविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने ११ ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत राज्यभरात ‘विश्वबंधुत्व पंधरवडा’ साजरा करण्यात येणार आहे.
सन २०२६ पासून दरवर्षी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय ‘अमृत’ संस्थेने घेतला आहे. बदलत्या सामाजिक आणि जागतिक परिस्थितीत सामाजिक ऐक्य, सहिष्णुता आणि बंधुभावाची मूल्ये केवळ एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता ती प्रत्यक्ष कृतीत आणणे, हा या पंधरवड्याचा मुख्य उद्देश आहे.

‘शिकागो भाषण कृती कार्यक्रम’ाचे आयोजन

या पंधरवड्यादरम्यान ‘शिकागो भाषण कृती कार्यक्रम’ राबविण्यात येणार आहे. स्वामी विवेकानंदांचे विचार दैनंदिन जीवनात आचरणात आणण्यासाठी शाळा, महाविद्यालये तसेच सामाजिक संस्थांच्या स्तरावर विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत.
यामध्ये वक्तृत्व व इतर स्पर्धा, व्याख्याने, परिसंवाद तसेच जनजागृतीपर कार्यक्रमांद्वारे विश्वबंधुत्व, सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

शाळा, महाविद्यालये व संस्थांना सहभागाचे आवाहन

राज्यातील सर्व शाळा, विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था, शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच खाजगी आस्थापनांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन ‘अमृत’च्या वतीने करण्यात आले आहे.
या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्थांसाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक संस्थांनी vbd.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी.
‘विविधतेतून एकता, एकतेतून बंधुता आणि बंधुतेतून सशक्त समाज व समर्थ राष्ट्र’ हे ब्रीद समोर ठेवून नागरिक, युवक आणि विद्यार्थ्यांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here