सावंतवाडीत आयुष ओपीडीचा शुभारंभ

0
13
सावंतवाडीत आयुष ओपीडीचा शुभारंभ
सावंतवाडीत आयुष ओपीडीचा शुभारंभ

सावंतवाडीत आयुष ओपीडीचा शुभारंभ

आमदार दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश

सावंतवाडी –
सावंतवाडी शहर व परिसरातील नागरिकांना आयुर्वेदिक उपचारांची चांगली सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी सावंतवाडी नगरपरिषद आणि गोवा येथील धारगळ येथील अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थान यांच्यात सामंजस्य करार (MOU) करून आयुष ओपीडी सुरू करण्यात आली आहे. यामधून नागरिकांना मोफत ओपीडी सेवा, औषधे व आवश्यक उपकरणांची सुविधा मिळणार आहे.
आयुष ओपीडीसाठी आमदार दीपक केसरकर यांनी गेल्या काही महिन्यांपासून पाठपुरावा केला होता. आयुष मंत्रालयाचे संचालक प्रा. डॉ. प्रदीपकुमार प्रजापती यांनी प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर मार्ग मोकळा झाला. नगरपरिषदेने त्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे.
यावेळी बोलताना आ. केसरकर म्हणाले, महाराष्ट्रातील पहिल्या आयुष ओपीडीपैकी एक सुविधा सावंतवाडीत सुरू होणे ही अभिमानाची बाब आहे. यासाठी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांचे विशेष श्रेय आहे. गोव्यात आयुषच्या माध्यमातून मोठ्या आरोग्य सुविधा उभारल्या असून माजी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी त्याला पूर्णत्व दिले. धारगळ संस्थेत सिंधुदुर्गातील सुमारे ४० टक्के रुग्ण उपचारासाठी येतात.
सावंतवाडी ही आयुर्वेदिक परंपरा असलेली भूमी आहे. येथे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व नगरपालिकेचा आयुर्वेदिक दवाखाना चांगल्या प्रकारे सुरू आहे. त्यामुळे या ओपीडीमुळे आणखी चालना मिळेल. भविष्यात पंचकर्म, योगा सेंटर, वेलनेस सेंटर व हेल्थ पार्क सारख्या सुविधा विकसित कराव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दोडामार्ग एमआयडीसीतील सुमारे ५० एकर जमीन आयुष मंत्रालयासाठी उपलब्ध करून देण्यात आली असून तेथे विविध आरोग्य सुविधा निर्माण करण्याचा विचार व्हावा. पर्यटन जिल्ह्यात आरोग्य पर्यटनाला चालना देण्यासाठी सावंतवाडीत आयुर्वेदिक व वेलनेस सुविधांचा विस्तार महत्त्वाचा ठरेल, असेही केसरकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here