कुडाळ उपविभागात ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबरला महसूल लोकअदालत
कुडाळ उपविभागात ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबरला महसूल लोकअदालत
प्रलंबित महसुली प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्यासाठी विशेष अभियान
कुडाळ :
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कुडाळ उपविभागात प्रलंबित महसुली प्रकरणे, वाद व तक्रारींचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी ‘महात्मा जोतीराव फुले महसूल लोकअदालत अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत प्रलंबित महसुली अर्धन्यायिक प्रकरणांचा आपसी तडजोडीने निपटारा करण्यात येणार आहे.
उपविभागीय अधिकारी, कुडाळ तसेच तहसीलदार कुडाळ व मालवण यांच्या न्यायालयातील अधिकार अभिलेख व कुळकायदा विषयक प्रकरणे, तसेच कुडाळ व मालवण तालुक्यातील मंडळ अधिकारी स्तरावर प्रलंबित तक्रारी व फेरफार नोंदींचा अभियानांतर्गत प्राधान्याने निपटारा करण्यात येणार आहे.
बुधवार, ३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, कुडाळ, तहसीलदार कार्यालय, कुडाळ तसेच कुडाळ तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी कार्यालयांमध्ये महसूल लोकअदालत आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी संबंधित कार्यालयांमध्ये प्रलंबित दावे, हरकती व अपील प्रकरणांचा तडजोडीने निपटारा केला जाणार आहे.
तसेच गुरुवार, १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता तहसीलदार कार्यालय, मालवण तसेच मालवण तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी कार्यालयांमध्ये महसूल लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्याकडील मालवण तालुक्यातील प्रलंबित अपील व दाव्यांचा तडजोडीने निपटारा करण्यात येणार आहे.
कुडाळ उपविभागातील संबंधित पक्षकार, अर्जदार, हितसंबंधित व नागरिकांनी आपली प्रलंबित महसुली प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी प्रकरण ज्या महसुली न्यायालयात प्रलंबित आहे, त्या संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा आणि ‘महात्मा जोतीराव फुले महसूल लोकअदालत अभियानाचा’ जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे कुडाळ उपविभागाच्या दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.