‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ लोगो स्पर्धेला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ लोगो स्पर्धेला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
विजेत्यास १० हजार रुपयांचे रोख पारितोषिक; नागरिक, विद्यार्थी, कलाकार व ग्राफिक डिझायनर्सना सहभागाचे आवाहन
रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी आकर्षक, अर्थपूर्ण आणि जिल्ह्याची वैशिष्ट्ये प्रतिबिंबित करणारा अधिकृत लोगो निश्चित करण्यासाठी आयोजित जिल्हास्तरीय लोगो स्पर्धेला ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्हा नियोजन अधिकारी निवास यादव यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील इच्छुक नागरिक, विद्यार्थी, कलाकार, ग्राफिक डिझायनर्स तसेच कला व डिझाईन क्षेत्रातील व्यक्तींना सहभागी होता येणार आहे. उत्कृष्ट व निवड झालेल्या लोगोच्या विजेत्यास १० हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.
रत्नागिरीची ओळख लोगोमधून उमटविण्याचे आवाहन
लोगोच्या संकल्पनेत रत्नागिरीचे सागरी वैभव, निळाशार समुद्र, मत्स्यव्यवसाय, बंदरे, सह्याद्रीची हिरवाई, पर्यटन, जगप्रसिद्ध हापूस तसेच कोकणी संस्कृती, रोजगारनिर्मिती, आधुनिक उद्योजकता आणि शाश्वत विकास यांचा समावेश अपेक्षित आहे.
डिझाइनसाठी तांत्रिक निकष
लोगो JPG किंवा PNG फॉरमॅटमध्ये सादर करावा. शक्य असल्यास CorelDRAW, PDF, EPS किंवा Vector फाईलही जोडावी. लोगोचा अर्थ व त्यामागील संकल्पना स्पष्ट करणारे १०० ते १५० शब्दांचे टिपण जोडणे अनिवार्य आहे.
लोगो डिजिटल माध्यमांपासून शासकीय फलक, लेटरहेड आणि पुस्तकांपर्यंत विविध आकारांमध्ये स्पष्ट व प्रभावी दिसणारा असावा. मौलिकता, आकर्षक रंगसंगती, साधेपणा आणि योजनेच्या उद्दिष्टांशी सुसंगतता या निकषांवर १०० गुणांमधून लोगोचे मूल्यांकन करण्यात येणार आहे.
नियम व अर्जाची अंतिम मुदत
लोगो पूर्णपणे मूळ व स्वतः तयार केलेला असावा. नक्कल आढळल्यास प्रवेशिका बाद करण्यात येईल. कोणत्याही राजकीय, धार्मिक किंवा जातीय भावना दुखावणारे घटक तसेच अधिकृत शासकीय राजमुद्रेचा वापर करण्यास मनाई आहे. निवडलेल्या लोगोचे सर्व कॉपीराइट्स व हक्क ‘सिंधुरत्न कार्यकारी समिती’कडे राहतील.
अंतिम मुदत : ३० सप्टेंबर २०२६, सायंकाळी ५ वाजेपर्यंत ई-मेल :[email protected] प्रत्यक्ष अर्ज : जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी.