श्री देव रवळनाथ सामाजिक सेवा संस्थेतर्फे वायंगणीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
आचरा – विवेक परब
आचरा-वायंगणी येथील श्री देव रवळनाथ सामाजिक सेवा संस्था (रजि.) मुंबई यांच्या वतीने वायंगणी परिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. गुरुवार दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय, वायंगणीच्या सभागृहात हा उपक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष श्री. हनुमंत प्रभू, संस्था सदस्य श्री. विलास सावंत, श्री. सुरेश सावंत, श्री. सत्यवान सावंत, श्री. शाम (भाई) सावंत, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्री. सुंदर सावंत, श्री देव रवळनाथ सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री. हरिश्चंद्र सावंत, सचिव श्री. प्रथमेश सावंत, कालावल शाळेचे मुख्याध्यापक श्री. जोशी सर, ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. डी. जे. टकले सर, प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी व सेवानिवृत्त केंद्रप्रमुख श्रीमती भारती कांबळी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी सामाजिक सेवा संस्थेचे सचिव श्री. प्रथमेश सावंत यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी श्री देव रवळनाथ सामाजिक सेवा संस्थेच्या कार्याची माहिती देतानाच भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी संस्थेचे सदस्य श्री. सावंत, श्री. सुंदर सावंत, श्री. विलास सावंत, श्री. सुरेश सावंत व श्री. भास्कर कांबळी यांनी आपले विचार व्यक्त केले. शाळेच्या माजी विद्यार्थिनी व सेवानिवृत्त केंद्रप्रमुख श्रीमती भारती कांबळी यांनी शाळेशी असलेले आपले जिव्हाळ्याचे नाते व ऋणानुबंध याविषयी मनोगत व्यक्त केले. “शाळेशी असलेले नाते व ऋणानुबंध कधीही विसरू नका. या ज्ञानमाऊलीच्या ऋणात राहून तिची सेवा करण्याचे भाग्य मिळवा,” असे आवाहन त्यांनी केले.
ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष श्री. हनुमंत प्रभू यांनी ग्रामीण भागातील शाळांसमोरील विविध प्रश्नांवर भाष्य केले. शासकीय धोरणांमुळे खेडोपाडी असलेल्या शाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होत असून, दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या घटत असल्याने शिक्षक संख्येवरही परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. संस्था, संघटना, शिक्षक, पालक व शिक्षणप्रेमींनी एकत्र येऊन शाळा वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
तसेच दि. ५ ऑक्टोबर २०२६ पासून ‘महाराष्ट्र राज्य शिक्षण वाचवा, शाळा वाचवा मंचा’च्या वतीने आझाद मैदान, मुंबई येथे उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचे सांगत, माजी विद्यार्थी व शिक्षणप्रेमींनी या चळवळीत सहभागी होऊन आपल्या गावातील शाळा वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात श्री देव रवळनाथ सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री. हरिश्चंद्र सावंत यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सदैव पुढाकार घेईल, अशी ग्वाही दिली. सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा व आरोग्य या उद्दिष्टांना केंद्रस्थानी ठेवून संस्थेची स्थापना करण्यात आली असून, भविष्यात या माध्यमातून गावात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर उपस्थित प्रत्येक विद्यार्थ्याला संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाबद्दल विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
श्री देव रवळनाथ सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक श्री. मंगेश सावंत यांच्या सामाजिक कार्याचे ग्रामस्थांच्या वतीने कौतुक करून त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन संस्थेचे सहसचिव श्री. निलेश सावंत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थांनी सहकार्य केले. प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. संजय जाधव सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.