दापोलीच्या जेसीआय कडून बहुविकलांग मुलांसाठी समर्पित सहा महिलांचा सन्मान
‘Salute the Silent Stars’ उपक्रमातून जेसीआय सप्ताहाचा समारोप
दापोली प्रतिनिधी : अरविंद मांडवकर
दापोली :
बहुविकलांग व गतिमंद मुलांच्या शिक्षण, संगोपन आणि पुनर्वसनासाठी आपले आयुष्य समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या सहा महिला कर्मचाऱ्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जेसीआय दापोलीच्या वतीने ‘Salute the Silent Stars’ हा उपक्रम राबविण्यात आला. आनंद फाऊंडेशन संचलित बहुविकलांग व गतिमंद मुलांचे पुनर्वसन व शिक्षण केंद्र, जालगाव, दापोली येथे १५ सप्टेंबर रोजी जेसीआय सप्ताहाच्या ग्रँडz फिनालेनिमित्त हा उपक्रम पार पडला.

बहुविकलांग मुलांचे शिक्षण, संगोपन, दैनंदिन गरजा आणि त्यांची काळजी घेणे हे अत्यंत संयम, संवेदनशीलता आणि समर्पणाची गरज असलेले कार्य आहे. या सहाही महिला अत्यंत ममत्वाने आणि निष्ठेने ही जबाबदारी पार पाडत आहेत. विशेष म्हणजे गणेशोत्सव, दिवाळी तसेच उन्हाळी सुट्टीच्या काळात अनेक मुलांना पालक घरी घेऊन जाऊ शकत नाहीत. अशा वेळी या महिला स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून केंद्रातील मुलांसोबतच राहतात आणि त्यांची काळजी घेतात. कोणतीही अपेक्षा न ठेवत त्या सातत्याने आणि मनापासून आपले कार्य करत आहेत. या विशेष मुलांच्या चेहऱ्यावर उमटणारे हास्य हीच त्यांच्या सेवाभावाची खरी पावती आहे. त्यांच्या या निस्वार्थ कार्याला समाजाकडून अधिक कौतुक आणि प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे.



