गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतुकीत बदल
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतुकीत बदल
१८ ते २५ सप्टेंबरदरम्यान वाहतूक व्यवस्थेत बदल; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
पुणे :
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतूक सुरळीत राहावी आणि गणेश मंडळांच्या मिरवणुका तसेच नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित व्हावी, यासाठी १८ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत शहरातील वाहतुकीत आवश्यक बदल करण्यात आले आहेत.अत्यावश्यक सेवेतील वाहने, अग्निशमन दलाची वाहने, पोलीस वाहने आणि रुग्णवाहिका यांना यातून वगळण्यात आले आहे.
१८ सप्टेंबरपासून बंद करण्यात येणारे मार्ग व पर्यायी मार्ग : लक्ष्मी रोडवरील हमजेखान चौक ते सेवासदन चौक हा मार्ग वाहतुकीस बंद राहणार आहे. या मार्गावरील वाहनांनी डुल्या मारुती चौकातून उजवीकडे वळून दारूवाला पूल मार्गे इच्छित स्थळी जावे. तसेच हमजेखान चौकातून डावीकडे वळून महाराणा प्रताप रोडने पुढे घोरपडे पेठ पोलीस चौकीमार्गे शंकरशेठ रोडचा वापर करावा. शिवाजी रोडवरील गाडगीळ पुतळा ते रामेश्वर चौक या मार्गावरील वाहतूकही बंद राहणार आहे. शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी स. गो. बर्वे चौक-जे. एम. रोड-अलका चौक-टिळक रोड किंवा शास्त्री रोडचा वापर करावा. तसेच संभाजी चौक-कामगार पुतळा चौक-शाहीर अमर शेख चौक-बोल्हाई चौक मार्गे नेहरू रोडचा पर्यायी मार्ग वापरता येणार आहे. आप्पा बळवंत चौक ते मोती चौक या मार्गावरील वाहतुकीसही निर्बंध राहणार असून, वाहनचालकांनी बाजीराव रोडचा वापर करावा.
दररोज सायंकाळी ५ वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत अतिरिक्त निर्बंध : लक्ष्मी रोडवरील सेवासदन चौक ते टिळक चौक तसेच शिवाजी रोडवरील रामेश्वर चौक ते जेधे चौक या मार्गांवर १८ ते २५ सप्टेंबरदरम्यान दररोज सायंकाळी ५ वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत आवश्यकतेनुसार चारचाकी, रिक्षा, दुचाकी यांसह सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस मनाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कालावधीत काही प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचे नियमन, मार्गबदल तसेच आवश्यकतेनुसार वाहतूक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
गणेशोत्सव काळात शहरातील गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे तसेच बदललेल्या वाहतूक व्यवस्थेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.