बीड-पुणे थेट रेल्वेसेवेचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

0
14
दादांचा शब्द पूर्ण; बीड-पुणे थेट रेल्वेसेवेचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ
दादांचा शब्द पूर्ण; बीड-पुणे थेट रेल्वेसेवेचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

बीड-पुणे थेट रेल्वेसेवेचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

दादांचा शब्द पूर्ण

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी बीडकरांसाठी महत्त्वपूर्ण रेल्वे कनेक्टिव्हिटी

बीड :
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून बीडकरांसाठी बीड-पुणे थेट रेल्वेसेवेचा शुभारंभ करण्यात आला. अनेक दशकांपासून प्रतीक्षेत असलेल्या या रेल्वेसेवेला हिरवा झेंडा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दाखविला. रेल्वेच्या प्रस्थानाची घोषणा, शिट्टीचा आवाज आणि इंजिनाची गर्जना यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी सांगितले की, अजित पवार यांनी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाच्या काळात रेल्वे जोडणीला प्राधान्य दिले होते. १७ सप्टेंबर २०२५ रोजी बीड-अहिल्यानगर रेल्वेसेवेच्या शुभारंभावेळी बीडकरांना पुढील वर्षी पुण्याला रेल्वेने जाता येईल, असा शब्द दिला होता. तो पूर्ण होत असल्याचे सांगत त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच येत्या काही महिन्यांत बीड-पनवेल थेट रेल्वेसेवा सुरू करण्याचा मानस व्यक्त केला. बीड-परळी रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यानंतर दक्षिण भारताशी रेल्वे संपर्क वाढण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, बीडच्या सांस्कृतिक व शैक्षणिक विकासाशी संबंधित दोन प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी ८ कोटी १९ लाख रुयांचा निधी मंजूर झाला असून, आधुनिक ध्वनी व प्रकाश व्यवस्था, साउंड अ‍ॅकौस्टिक्स, सेंट्रल एसी, आसनव्यवस्था आणि आधुनिक ग्रीन रूम्स उभारण्यात येणार आहेत.
धानोरा रस्त्यावरील ‘पंढरी’ येथे सुमारे २८ कोटी रुपये खर्चाचा तारांगण व विज्ञान उद्यान प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत १४ कोटी रुपयांना मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पातून विद्यार्थ्यांना मातृभाषेतून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), आभासी तंत्रज्ञान आणि खगोलशास्त्राची माहिती मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी ‘भारतीय रेल्वेचे महाराष्ट्र राज्याच्या विकासात योगदान’ या विषयावरील निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्या शाळकरी विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले. तसेच मराठवाडा मुक्तिसंग्रामातील हुतात्मे आणि स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यात आले. बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here