ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळतोय मोडी लिपीचा अनमोल वारसा !
ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळतोय मोडी लिपीचा अनमोल वारसा !
दौंड तालुक्यातील साळोबा वस्ती येथे जिल्हा परिषद विद्यार्थ्यांना मोडी लिपी वाचनाचे धडे
दौंड :
भारत देशासह महाराष्ट्राला समृद्ध आणि वैभवशाली सांस्कृतिक वारसा लाभला आहे. या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेव्याचा मोठा भाग मोडी लिपीमध्ये जतन झालेला आहे. इतिहासाच्या या अमूल्य ज्ञानाचा ठेवा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही उलगडता यावा, यासाठी दौंड तालुक्यातील साळोबा वस्ती येथे जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना मोडी लिपी वाचनाचे धडे दिले जात आहेत.
मोडी लिपी ही महाराष्ट्राच्या इतिहास, प्रशासन आणि सामाजिक जीवनाशी निगडित अनेक महत्त्वाच्या नोंदींचे माध्यम राहिली आहे. त्यामुळे या लिपीचे वाचन आणि आकलन करण्याचे दुर्मिळ ज्ञान विद्यार्थ्यांना लहान वयातच मिळावे, या उद्देशाने जिल्हा परिषद प्रशासनाकडून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या इतिहासाशी आणि संस्कृतीशी जोडण्याबरोबरच जुन्या दस्तऐवजांमधील माहिती समजून घेण्याची संधी या उपक्रमातून मिळत आहे. मोडी लिपी शिकण्याबाबत विद्यार्थ्यांमध्येही उत्सुकता असून, त्यांना मिळणारा प्रतिसाद कौतुकास्पद आहे. नव्या पिढीपर्यंत हा ऐतिहासिक वारसा पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.