उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते शुभारंभ; ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना जीवन गौरव पुरस्कार
पुणे :
श्री गणेश कला-क्रीडा रंगमंच, स्वारगेट येथे पुणे फेस्टिवलच्या ३८व्या पर्वाचे उद्घाटन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते दिमाखात झाले. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार हेमा मालिनी, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्यासह पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मीरा सुरेश कलमाडी आदी मान्यवर उपस्थित होते.
परंपरा आणि आधुनिकता यांचा समन्वय साधत विकासाकडे वाटचाल करताना भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, भाषा, कला, परंपरा आणि मूल्यांचे जतन करणे आवश्यक आहे. आधुनिक पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि आर्थिक विकासासोबत सांस्कृतिक मुळांशी नाते दृढ ठेवणे ही विकसित भारताची खरी ओळख असल्याचे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी यावेळी केले.
पुणे फेस्टिवलने कला, संस्कृती, संगीत, नृत्य, साहित्य, क्रीडा आणि पर्यटन या विविध क्षेत्रांना एकत्र आणत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. यंदाच्या महोत्सवात २१ देशांतील विद्यार्थ्यांचा सहभाग असून, विविध देशांतील कलाकार, पर्यटक, प्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे सांस्कृतिक देवाणघेवाणीला चालना मिळत असल्याचे उपराष्ट्रपतींनी नमूद केले.
पर्यटन हे आर्थिक विकासाचे महत्त्वाचे साधन असून, महाराष्ट्रातील सांस्कृतिक पर्यटनाला जागतिक स्तरावर चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले. पुणे फेस्टिवलला भविष्यात आणखी विस्तार देऊन जागतिक सांस्कृतिक महोत्सव म्हणून विकसित करण्याची क्षमता असल्याचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी सांगितले.
मोठ्या कलाकारांसोबतच नवोदित कलाकारांना व्यासपीठ देणे, महिला महोत्सव, लावणी महोत्सव, चित्रकला, नृत्य, पाककला, मेहंदी तसेच विविध स्पर्धांचे आयोजन आणि आंतरराष्ट्रीय सहभाग ही पुणे फेस्टिवलची वैशिष्ट्ये असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले.
दरम्यान, उद्घाटन सोहळ्यात उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना ‘पुणे फेस्टिवल जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.