पोलिस गणवेशातील बाप्पाचे रूप ठरले आकर्षणाचे केंद्र
कुडाळ : प्रतिनिधी
वेंगुर्ले तालुक्यातील निवती पोलीस ठाण्यात यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त पोलिस गणवेशातील आकर्षक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या भूमिकेचे प्रतीक असलेले बाप्पाचे हे आगळे रूप सर्वांचे लक्ष वेधून घेत असून, पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांकडून या अनोख्या संकल्पनेचे कौतुक होत आहे.
पोलिसांच्या गणवेशात विराजमान असलेल्या गणरायाच्या हातात पोलिसांचा दंडुका असून, पोलिस अधिकारी म्हणून साकारण्यात आलेले बाप्पाचे हे रूप विशेष आकर्षण ठरत आहे. गणेशमूर्तीच्या माध्यमातून पोलिसांचे कर्तव्य, शिस्त आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी असलेली जबाबदारी यांचे प्रतीकात्मक दर्शन घडत आहे.
गणेशोत्सवाच्या काळात निवती पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी भक्तिभावाने गणरायाची पूजा-अर्चा करीत आहेत. पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांनाही या आगळ्यावेगळ्या गणेशमूर्तीचे दर्शन घेता येत असून, परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीस कर्तव्य आणि गणेशभक्तीचा अनोखा संगम घडविणारी निवती पोलीस ठाण्यातील ही गणेशमूर्ती यंदाच्या गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण ठरली आहे.