राज्यात आज वादळी पावसाचा इशारा; २४ जिल्ह्यांना येलो अलर्ट

0
18
राज्यात आज वादळी पावसाचा इशारा; २४ जिल्ह्यांना येलो अलर्ट
राज्यात आज वादळी पावसाचा इशारा; २४ जिल्ह्यांना येलो अलर्ट

राज्यात आज वादळी पावसाचा इशारा; २४ जिल्ह्यांना येलो अलर्ट

मुंबई :
राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि काही भागांत रविवारी, दि. २० सप्टेंबर रोजी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने राज्यातील २४ जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे व पुणे घाट परिसर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आल्याची माहिती आहे.
या भागांत काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी, तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. वादळी स्थितीत वाऱ्याचा वेगही वाढण्याची शक्यता असून, विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांना या कालावधीत विशेष अलर्ट नसला तरी काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता कायम आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी पिकांची आवश्यक काळजी घ्यावी. विजांचा कडकडाट होत असताना नागरिकांनी मोकळ्या जागेत, झाडाखाली किंवा विजेच्या खांबाजवळ थांबू नये, तसेच सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here