झाडाला धडकून एसटी बस दरीत अडकली; मोठा अनर्थ टळला

0
34
झाडाला धडकून एसटी बस दरीत अडकली; मोठा अनर्थ टळला
झाडाला धडकून एसटी बस दरीत अडकली; मोठा अनर्थ टळला

झाडाला धडकून एसटी बस दरीत अडकली; मोठा अनर्थ टळला

चालक-वाहकांसह १२ प्रवासी किरकोळ जखमी; मद्यप्राशन केल्याचा प्रवाशांचा आरोप

वैभववाडी प्रतिनिधी :
कणकवली आगाराची कणकवली–मौंदे एसटी बस अरुणा धरणाजवळ भोम गवळवाडी हद्दीत सुमारे २०० फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला. शुक्रवारी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. सुदैवाने बस दरीत कोसळताना एका झाडाला धडकून थांबल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा बस थेट धरणाच्या पाण्यात कोसळली असती, तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. या अपघातात चालक, वाहकांसह १२ प्रवासी किरकोळ जखमी झाले.
कणकवली–मौंदे बस चालक युवराज बंडा पाटील हे बस मौंदेच्या दिशेने घेऊन जात होते. अरुणा धरणाच्या रिंग रोडवरील अवघड वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस रस्त्यालगतच्या खोल दरीत कोसळली. मात्र, दरीत असलेल्या एका झाडाला बस धडकल्याने ती पुढे जाण्यापासून थांबली.
अपघातानंतर परिसरात मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसतानाही वाहक आणि प्रवाशांनी प्रसंगावधान राखत बसमधून सुरक्षितपणे बाहेर पडून रस्त्यावर येण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एका खासगी वाहनाच्या मदतीने सर्वजण मौंदे येथे पोहोचले.
खासगी वाहनचालक आनंद जामदार यांनी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे यांना अपघाताची माहिती दिली. रावराणे यांनी तातडीने वैभववाडी पोलीस आणि एसटी विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, पोलीस कर्मचारी शैलेश कांबळे, किरण मेथे आणि मनोज कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींची विचारपूस केली. चालक आणि वाहक यांना पुढील उपचारासाठी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
एसटी विभागाचे विभाग नियंत्रक श्री. घोडे, अधिकारी श्री. देशमुख, निलेश लाड, डेपो व्यवस्थापक श्रीमती जाधव, श्रीनिवास कदम आणि बाबू मुळदे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
दरम्यान, चालकाने मद्यप्राशन करून बस चालवल्याचा आरोप काही प्रवाशांनी केला आहे. या आरोपाची सत्यता तपासण्यासाठी वैभववाडी पोलिसांनी चालकाची वैद्यकीय तपासणी करण्याबाबत ग्रामीण रुग्णालयाला पत्र दिले आहे. त्यामुळे वैद्यकीय तपासणीच्या अहवालानंतरच या आरोपाबाबत अधिक स्पष्टता येणार आहे.
अपघातग्रस्त एसटी बस शनिवारी दुपारपर्यंत दरीतच अडकून होती. या घटनेमुळे अरुणा धरण परिसरातील रस्त्यावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here