उच्च शिक्षणासाठी नवीन महाविद्यालयांच्या स्थळबिंदूंची छाननी; CET केंद्रांची संख्या वाढविण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
उच्च शिक्षणासाठी नवीन महाविद्यालयांच्या स्थळबिंदूंची छाननी; CET केंद्रांची संख्या वाढविण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई :
राज्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या सुविधा अधिक समन्यायी पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी नवीन महाविद्यालये सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाच्या (माहेड) बैठकीत पंचवार्षिक आराखड्याबाहेरील पात्र स्थळबिंदूंची छाननी करण्यासाठी उपसमिती गठीत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधी तसेच शैक्षणिक संस्थांकडून प्राप्त झालेल्या निवेदनांचा विचार करून २०२७-२८ च्या वार्षिक योजनेसाठी पंचवार्षिक आराखड्याबाहेरील पात्र स्थळबिंदू निश्चित करण्यात येणार आहेत. संबंधित उपसमितीने आवश्यक निकषांची तपासणी करून त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
CET परीक्षा केंद्रांची संख्या वाढणार
सामाईक प्रवेश परीक्षा (CET) देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रे जवळच्या ठिकाणी उपलब्ध व्हावीत, यासाठी केंद्रांची संख्या वाढविण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. विद्यार्थ्यांच्या सूचना आणि अभिप्रायांचा विचार करून CET परीक्षेच्या प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करण्यासही त्यांनी सांगितले.
परीक्षा केंद्रांची संख्या वाढविताना सुरक्षा, पारदर्शकता आणि CET सेलचे प्रभावी नियंत्रण व देखरेख कायम ठेवण्यावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या. राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील तांत्रिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत विविध सूचना आणि वेळापत्रके उपलब्ध आहेत.
अभियांत्रिकी प्रवेशातील मुलींचे प्रमाण वाढले
राज्य शासनाच्या मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याच्या निर्णयानंतर अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये मुलींच्या प्रवेशाचे प्रमाण वाढल्याचे बैठकीत सांगण्यात आले. २०२३-२४ मध्ये ३२.७२ टक्के असलेले मुलींच्या प्रवेशाचे प्रमाण २०२६-२७ मध्ये ३७.२७ टक्क्यांवर पोहोचले आहे.
याशिवाय केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेचा आढावा घेऊन ती विद्यार्थ्यांसाठी अधिक सुलभ, पारदर्शक आणि विद्यार्थीपूरक करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही बैठकीत चर्चा करण्यात आली.
मंत्रालयात झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत, आमदार अतुल भातखळकर तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.