वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या कामाचा आढावा; पुढील कार्यवाहीला गती देण्याच्या सूचनावैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या कामाचा आढावा; पुढील कार्यवाहीला गती देण्याच्या सूचना
वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या कामाचा आढावा; पुढील कार्यवाहीला गती देण्याच्या सूचना
मुंबई :
वैभववाडी ते कोल्हापूर या प्रस्तावित नवीन रेल्वे मार्गाच्या प्रकल्पासंदर्भात मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या दालनात आढावा बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ११ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या बंदर विकासाच्या बैठकीत या रेल्वे मार्गाबाबत देण्यात आलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीचा यावेळी आढावा घेण्यात आला.
बैठकीत प्रकल्पाची सद्यस्थिती, आतापर्यंत झालेली कार्यवाही तसेच पुढील आवश्यक प्रक्रियेबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेण्यात आली. प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेला गती देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या तसेच संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.
केंद्र सरकारच्या माहितीनुसार, कोल्हापूर-वैभववाडी या १०८ किलोमीटरच्या नवीन रेल्वे मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार झाला असून, पुढील टप्प्यात विविध भागधारकांशी सल्लामसलत आणि आवश्यक मंजुरीची प्रक्रिया अपेक्षित आहे.
या बैठकीस बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, मध्य रेल्वेच्या अधिकारी नलिनी व्ही. तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.