सिंधुदुर्गातील सर्व सात तालुके दुष्काळग्रस्त; विविध सवलती व उपाययोजना लागू
सिंधुदुर्गातील सर्व सात तालुके दुष्काळग्रस्त; विविध सवलती व उपाययोजना लागू
मुंबई :
सन २०२६ च्या खरीप हंगामात ‘ट्रिगर-वन’ प्रथम कळ लागू झालेल्या महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याबाबत दुष्काळासंदर्भातील उपाययोजना व सवलती लागू करण्याचा शासन निर्णय २५ सप्टेंबर रोजी मदत व पुनर्वसन विभागामार्फत जारी करण्यात आला आहे.
ठाणे महसूल विभागातील ठाणे व पालघर जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. मात्र, रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर आणि राजापूर, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण आणि देवगड या सर्व सात तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे.
ट्रिगर-वनअंतर्गत दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आलेल्या तालुक्यांसाठी विशेष बाब म्हणून विविध उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती आणि कृषी पंपाच्या चालू वीज बिलात सवलत देण्याचा समावेश आहे.
तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांच्या निकषांमध्ये शिथिलता देऊन जास्तीत जास्त कामे सुरू करणे, आवश्यक त्या ठिकाणी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, तसेच टंचाई जाहीर झालेल्या गावांमध्ये शेतीपंपाची वीज जोडणी खंडित न करण्याच्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.
शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी व शेतमजुरांना अन्नधान्याची टंचाई भासू नये यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर जनावरांसाठी आवश्यक चारा उपलब्ध करून देणे, जलसंवर्धनाची कामे सुरू करणे आणि यापूर्वी निर्गमित शासन निर्देशांनुसार पिण्याचे पाणी व जनावरांच्या पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सात तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश झाल्याने या उपाययोजनांचा लाभ शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच विद्यार्थ्यांना मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करणाऱ्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.