जुन्या मणेरी पुलाची सुरक्षा तपासा; बाबू गवस यांचे निवेदन
जुन्या मणेरी पुलाची सुरक्षा तपासा; बाबू गवस यांचे निवेदन
दोडामार्ग : शुभम गवस
दोडामार्ग तालुक्यातील दोडामार्ग–बांदा मार्गावरील ब्रिटिशकालीन मणेरी पूल जीर्ण झाल्याने त्याच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुलाचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून तो वाहतुकीसाठी सुरक्षित आहे की नाही, याची खात्री करावी, अशी मागणी काँग्रेसचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष गुणाजी केशव ऊर्फ बाबू गवस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
याबाबत त्यांनी दोडामार्ग येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपविभागीय अभियंत्यांना २४ सप्टेंबर रोजी लेखी निवेदन दिले. दोडामार्ग–बांदा मार्गावरील या पुलावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक होते. मात्र, पूल जुना व जीर्ण झाल्याने त्याची संरचनात्मक सुरक्षितता तपासणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याची सद्यस्थिती तपासावी. तसेच पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे निदर्शनास आल्यास खबरदारीचा उपाय म्हणून पुलावरील वाहतूक तात्पुरती बंद करावी, अशी मागणी बाबू गवस यांनी केली. यावेळी बाळा धाऊसकर, नंदकिशोर प्रसादी, सुधीर गवस यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. आता सार्वजनिक बांधकाम विभाग मणेरी पुलाच्या सुरक्षिततेबाबत कोणती कार्यवाही करतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.