‘सानिकाचा मृत्यू आत्महत्या नसून घातपात’; आईची मालवण पोलिसांकडे सखोल चौकशीची मागणी
‘सानिकाचा मृत्यू आत्महत्या नसून घातपात’; आईची मालवण पोलिसांकडे सखोल चौकशीची मागणी
सिंधुदुर्ग :
मालवण तालुक्यातील एका विवाहित महिलेच्या मृत्यूप्रकरणी तिच्या आईने मालवण पोलिसांकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे. ‘माझी मुलगी आत्महत्या करणार नाही, तिच्या मृत्यूमागे घातपात आहे’, असा दावा आई संजना गावडे यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत केला असून, या प्रकरणातील सत्य समोर आणून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सानिका हिचा वायंगवाडे येथील सिद्धेश प्रभू याच्याशी १७ फेब्रुवारी २०२५ रोजी विवाह झाला होता. लग्नानंतर सासरी किरकोळ कारणांवरून भांडण तसेच मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. सानिका माहेरी येत असताना तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
सानिकाच्या मनात दुःख आणि राग असला तरी तिने आत्महत्येचा विचार कधीही व्यक्त केला नव्हता, असा दावा तिच्या आईने केला आहे. त्यामुळे तिच्या मृत्यूची आत्महत्या म्हणून नोंद न करता त्यामागील परिस्थितीची सखोल चौकशी करावी, अशी मागणी कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, सानिकाच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर तिच्या कुटुंबावर सलग आघात झाले. नातीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने तिच्या आजोबांचे निधन झाल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. तसेच या धक्क्यामुळे आई संजना गावडे आणि तिच्या लहान बहिणीची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
या प्रकरणाची पोलिसांनी निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून सानिकाच्या मृत्यूमागील नेमके सत्य समोर आणावे, तसेच दोष आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तिच्या कुटुंबीयांनी केली आहे. या प्रकरणातील पुढील तपासाकडे परिसराचे लक्ष लागले आहे.