महाराष्ट्रातील SIR प्रक्रियेला मुदतवाढ; दावे-हरकती दाखल करण्यासाठी १२ ऑक्टोबरपर्यंत संधी
महाराष्ट्रातील SIR प्रक्रियेला मुदतवाढ; दावे-हरकती दाखल करण्यासाठी १२ ऑक्टोबरपर्यंत संधी
मुंबई :
महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणास (SIR) भारत निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली असून, मतदारांना दावे व हरकती दाखल करण्यासाठी आता १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार प्राप्त नोटिसा, दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध होणार आहे.
त्यामुळे पात्र नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव आणि तपशील तपासून घ्यावेत. नाव नोंदविणे, तपशिलात दुरुस्ती करणे किंवा अन्य बाबींविषयी दावा अथवा हरकत असल्यास विहित मुदतीत ती दाखल करता येणार आहे. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर SIR-2026 अंतर्गत नाव शोधणे तसेच दावे-हरकतींसंबंधी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
‘Unmapped’ आणि ‘Logical Discrepancies’ मतदारांसाठी घरपोच कागदपत्र संकलन
विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान ‘जुळणी न झालेले मतदार’ (Unmapped) किंवा ‘तार्किक विसंगती’ (Logical Discrepancies) या कारणांमुळे नोटिसा बजावण्यात आलेल्या मतदारांच्या घरी जाऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) आवश्यक कागदपत्रे संकलित करणार आहेत. त्यामुळे संबंधित मतदारांना कागदपत्रे सादर करण्यासाठी प्रत्येक वेळी मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता राहणार नाही. अपवादात्मक परिस्थितीत ऑनलाइन सुनावणी घेण्यात येऊ शकते.
वंचित घटकांसाठी विशेष मदत कक्ष व शिबिरे
मतदार यादीच्या पुनरीक्षण प्रक्रियेत बेघर नागरिक, मजूर, गरीब तसेच रात्र निवाऱ्यांमध्ये राहणारे नागरिक वंचित राहू नयेत, यासाठी गरजेनुसार विशेष मदत कक्ष आणि शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या माध्यमातून मतदार नोंदणी, मतदार यादीतील दुरुस्ती तसेच दावे व हरकती दाखल करण्यासाठी नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन व सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, तसेच नाव व इतर तपशील अचूक आहेत की नाही, हे तपासून घ्यावे. दावे किंवा हरकती असल्यास १२ ऑक्टोबर २०२६ पूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी नागरिकांना उपलब्ध आहे. SIR संदर्भातील मदतीसाठी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर १९५० हेल्पलाइनची माहितीही उपलब्ध आहे.