नवी मुंबईत भटक्या व पाळीव श्वानांसाठी रेबीज लसीकरण मोहीम
नवी मुंबईत भटक्या व पाळीव श्वानांसाठी रेबीज लसीकरण मोहीम
१ ते ९ ऑक्टोबरदरम्यान विभागनिहाय वेळापत्रक जाहीर; नागरिकांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन
नवी मुंबई : जागतिक रेबीज दिनाच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शहरातील भटक्या तसेच पाळीव श्वानांसाठी रेबीज लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. शासनाच्या सूचनेनुसार ही मोहीम आयोजित करण्यात आली असून, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या आदेशानुसार ‘इन डिफेन्स ऑफ ॲनिमल’ संस्थेमार्फत लसीकरण करण्यात येणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध विभागांसाठी लसीकरणाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. १ ऑक्टोबर रोजी बेलापूर, २ ऑक्टोबर रोजी नेरुळ, ३ ऑक्टोबर रोजी वाशी, ५ ऑक्टोबर रोजी तुर्भे, ६ ऑक्टोबर रोजी कोपरखैरणे, ७ ऑक्टोबर रोजी घणसोली, ८ ऑक्टोबर रोजी ऐरोली, तर ९ ऑक्टोबर रोजी दिघा विभागात श्वानांचे रेबीज लसीकरण करण्यात येणार आहे.
या सर्व ठिकाणी लसीकरणाची वेळ सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत असणार आहे. संबंधित नागरिकांनी आपल्या परिसरातील पाळीव तसेच भटक्या श्वानांचे रेबीज लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
लसीकरणाच्या वेळापत्रकाबाबत तसेच अधिक माहितीसाठी ९३२००५६५८५ / ९३२००५६५९२ या क्रमांकांवर संपर्क साधता येणार आहे. रेबीजसारख्या प्राणघातक आजाराचा धोका कमी करण्यासाठी श्वानांचे नियमित लसीकरण महत्त्वाचे असल्याने नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.