महाराष्ट्राच्या कृषी निर्यातीला नेदरलँड्सच्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड; सहकार्याचा कृती आराखडा तयार होणार

0
23
महाराष्ट्राच्या कृषी निर्यातीला नेदरलँड्सच्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड; सहकार्याचा कृती आराखडा तयार होणार
महाराष्ट्राच्या कृषी निर्यातीला नेदरलँड्सच्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड; सहकार्याचा कृती आराखडा तयार होणार

महाराष्ट्राच्या कृषी निर्यातीला नेदरलँड्सच्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड; सहकार्याचा कृती आराखडा तयार होणार

मुंबई :
महाराष्ट्रातील फलोत्पादन, कृषी व्यवसाय, काढणीनंतरचे व्यवस्थापन, निर्यात आणि कृषी-लॉजिस्टिक्स क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी नेदरलँड्ससोबतची भागीदारी अधिक व्यापक करण्याचे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले. यासाठी दोन्ही देशांतील संबंधित अधिकाऱ्यांच्या समन्वयातून विविध सहकार्य क्षेत्रांचा समावेश असलेला कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.
मंत्रालयात नेदरलँड्सचे अन्न सुरक्षा, मत्स्यव्यवसाय व फलोत्पादन मंत्री सिल्व्हियो एर्कन्स यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली.
महाराष्ट्रातील कृषी उत्पादनांची निर्यात वाढविण्यासाठी वाढवण बंदर ते रॉटरडॅम बंदर कृषी वाहतूक साखळी, कोल्ड-चेन आणि नियंत्रित वातावरणातील साठवण तंत्रज्ञान याबाबत सहकार्याच्या शक्यता तपासण्यात येणार आहेत. तसेच दापचरी आंतरराष्ट्रीय कृषी बाजाराच्या विकासासाठी रॉयल फ्लोराहॉलंड आणि रॉटरडॅमच्या कृषी-लॉजिस्टिक्स व्यवस्थेचा अनुभव घेण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
‘मॅग्नेट २.०’ अंतर्गत केळी, डाळिंब, आंबा, लिंबूवर्गीय फळे, काजू आणि हळद या सहा पिकांसाठी प्रस्तावित ग्रीनफिल्ड कृषी क्लस्टर्समध्ये डच कंपन्यांना तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि संयुक्त उपक्रमांसाठी सहभागी करून घेण्यावर भर देण्यात आला.
तळेगाव येथील एनआयपीएचटी संस्थेचा काढणीनंतरचे व्यवस्थापन, निर्यात प्रोटोकॉल, गुणवत्ता तपासणी आणि प्रशिक्षणासाठी विकास करण्याबाबतही विचारविनिमय झाला. युरोपीय बाजारपेठेसाठी अन्नसुरक्षा व कमाल अवशेष मर्यादा (एमआरएल) निकषांचे पालन, कृषी उत्पादनांची शोधयोग्यता, जलव्यवस्थापन, हवामान-लवचिक शेती, रोबोटिक्स आणि नवीन वाणांच्या विकासासाठी डच तंत्रज्ञान व तज्ज्ञांचे सहकार्य घेण्यावरही चर्चा झाली.
यावेळी कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, पणन सचिव प्रवीण दराडे, कृषी सचिव परिमल सिंह यांच्यासह दोन्ही देशांतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here