जागतिक रेबीज दिनानिमित्त दोडामार्गात जनजागृती रॅली उत्साहात

0
15
जागतिक रेबीज दिनानिमित्त दोडामार्गात जनजागृती रॅली उत्साहात
जागतिक रेबीज दिनानिमित्त दोडामार्गात जनजागृती रॅली उत्साहात

जागतिक रेबीज दिनानिमित्त दोडामार्गात जनजागृती रॅली उत्साहात

दोडामार्ग : शुभम गवस :
जागतिक रेबीज दिनानिमित्त नागरिकांमध्ये रेबीज या प्राणघातक आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी आमदार दीपकभाई केसरकर विज्ञान महाविद्यालय आणि दोडामार्ग नगरपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रॅलीमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच नगरपंचायतीचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी रेबीजबाबत जनजागृती करणाऱ्या घोषणा देत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. “रेबीज टाळा, जीवन वाचवा”, “प्राण्यांचे लसीकरण करा”, “प्राणी चावल्यास त्वरित उपचार घ्या” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
कुत्रा किंवा इतर प्राण्याने चावा घेतल्यास जखम साबण आणि वाहत्या पाण्याने त्वरित स्वच्छ धुणे आवश्यक आहे. त्यानंतर विलंब न करता वैद्यकीय उपचार घेणे गरजेचे असल्याचे यावेळी नागरिकांना सांगण्यात आले. तसेच पाळीव प्राण्यांचे नियमित लसीकरण करण्याचे आवाहनही करण्यात आले.
रेबीज हा प्राण्यांच्या चाव्यामुळे होणारा गंभीर आजार असून, वेळेवर प्रतिबंधात्मक उपाय आणि वैद्यकीय उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमुळे नागरिकांमध्ये रेबीजबाबत आवश्यक माहिती आणि खबरदारीचा संदेश पोहोचला.
जनजागृती रॅलीच्या आयोजनासाठी नगरपंचायतीचे पदाधिकारी व कर्मचारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here