नवीन उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अनुदानाची संधी; महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन

0
14
नवीन उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अनुदानाची संधी; महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन
नवीन उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अनुदानाची संधी; महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन

नवीन उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अनुदानाची संधी; महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन

सार्वजनिक क्षेत्रासाठी १०० टक्के, तर खासगी क्षेत्रासाठी ४० टक्के अनुदान

मुंबई :
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी क्षेत्र विस्तार कार्यक्रमात नवीन उती संवर्धन (Tissue Culture) प्रयोगशाळा स्थापन करण्याचा घटक समाविष्ट करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधितांनी महाडीबीटी पोर्टलवर फलोत्पादन घटकांतर्गत अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील कृषी विद्यापीठे तसेच शासन अंगीकृत संस्थांना नवीन उती संवर्धन प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी प्रकल्प खर्चाच्या १०० टक्के, कमाल २५० लाख रुपये इतके अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र, आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांनाच या घटकांतर्गत प्रयोगशाळा मंजूर केली जाणार आहे.
मान्यताप्राप्त निर्मिती तंत्रानुसार संबंधित प्रयोगशाळेला मान्यता असलेल्या पिकांची किमान २५ लाख रोपे उत्पादित करणे आवश्यक राहणार आहे.
खासगी क्षेत्रासाठी ४० टक्के अनुदान
खासगी क्षेत्रातील नवीन उती संवर्धन प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी प्रकल्प खर्चाच्या ४० टक्के, कमाल १०० लाख रुपये इतके अनुदान उपलब्ध आहे. हा प्रकल्प बँक कर्जाशी निगडित असणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त निर्मिती तंत्रानुसार पिकांची किमान २५ लाख रोपे उत्पादित करणे बंधनकारक राहील.
उती संवर्धन प्रयोगशाळेला जैवतंत्रज्ञान विभागाने निर्धारित केलेल्या मानके व निकषांनुसार अनुदान प्राप्त झाल्यापासून १८ महिन्यांच्या आत मानांकन प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक राहणार आहे.
अनुदानाची मर्यादा
सार्वजनिक उपक्रम, कृषी विद्यापीठे, सार्वजनिक संस्था आणि शासकीय प्रक्षेत्रांसाठी प्रकल्प खर्चाची कमाल मर्यादा २५० लाख रुपये असून त्यावर १०० टक्के अनुदान देय आहे. खासगी क्षेत्रासाठी प्रकल्प खर्चाची कमाल मर्यादा १०० लाख रुपये असून त्यावर ४० टक्के अनुदान देय आहे.
नवीन उती संवर्धन प्रयोगशाळा स्थापन करू इच्छिणाऱ्या संबंधितांनी महाडीबीटी पोर्टलवरील फलोत्पादन घटकांतर्गत अर्ज करावा. योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here