रत्नागिरीचा गणेशोत्सव आता रील्समधून जगभर; जिल्हास्तरीय ‘रील बाज व फोटोग्राफी स्पर्धा’ उत्साहात
रत्नागिरीचा गणेशोत्सव आता रील्समधून जगभर; जिल्हास्तरीय ‘रील बाज व फोटोग्राफी स्पर्धा’ उत्साहात
रत्नागिरी :
गणेशोत्सवाची परंपरा, सांस्कृतिक वैभव आणि भक्तीची विविध रूपे आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगभर पोहोचवण्याचा अभिनव उपक्रम रत्नागिरीत राबविण्यात आला. शिवसेना युवा सेना, रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने आयोजित ‘जिल्हास्तरीय गणेशोत्सव रील बाज व फोटोग्राफी स्पर्धा २०२६’ या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रत्नागिरीचा गणेशोत्सव आता रील्समधून जगभर; जिल्हास्तरीय ‘रील बाज व फोटोग्राफी स्पर्धा’ उत्साहात
“गणेशोत्सवाचा सांस्कृतिक वारसा आता रील्स आणि फोटोग्राफीच्या माध्यमातून जगभर पोहोचणार,” असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. रत्नागिरीच्या गणेशोत्सवातील भक्ती, परंपरा आणि उत्सवाचे विविध पैलू आधुनिक माध्यमातून प्रभावीपणे जतन आणि जगासमोर मांडण्याचा हा सुंदर प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
या स्पर्धेचे संकल्पक अथर्व राजन साळवी, रत्नागिरी सिंडिकेट फोटोग्राफर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मंत्री उदय सामंत यांनी मनापासून अभिनंदन केले. स्पर्धेत फोटोग्राफी, सिनेमॅटिक रील आणि मोबाईल रील अशा तीन गटांचा समावेश करण्यात आला होता.
गणेशोत्सवातील श्रद्धा, पारंपरिक प्रथा, सजावट, सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण तसेच उत्सवातील विविध क्षण आपल्या कलात्मक दृष्टीने टिपणाऱ्या सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे यावेळी कौतुक करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
रत्नागिरीत सुरू झालेल्या या उपक्रमाचा विस्तार पुढील वर्षी मुंबईसह संपूर्ण कोकणात आणि त्यानंतर महाराष्ट्रभर व्हावा, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली. गणेशोत्सवाची समृद्ध परंपरा, संस्कृती आणि वारसा नव्या पिढीच्या कल्पकतेतून डिजिटल माध्यमांद्वारे जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमांना निश्चितच प्रोत्साहन दिले जाईल, असे उदय सामंत यांनी सांगितले.