उरणच्या पानदिवे येथे ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जनजागृती कार्यक्रम
उरणच्या पानदिवे येथे ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जनजागृती कार्यक्रम
उरण :
पुंडलिक रामा पाटील स्कूल, पानदिवे, ता. उरण येथे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात संरक्षण अधिकारी श्रीमती चंचल विजेकर आणि सहायक श्री. मनोहर पाटील यांनी POSH Act आणि DV Act याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यस्थळी महिलांचे संरक्षण, तसेच कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांना मिळणारे कायदेशीर संरक्षण यासंदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी बाल संरक्षण कक्षाच्या समुपदेशक श्रीमती निलाक्षी दगडे यांनी बालकांचे हक्क, सुरक्षितता, महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजना तसेच चाईल्ड हेल्पलाईन १०९८ याबाबत मार्गदर्शन केले. बालकांनी कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी मदत घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या यंत्रणांची माहिती करून घेण्याचे आवाहन करण्यात आले.
या जनजागृती कार्यक्रमास शाळेतील ४७४ विद्यार्थी आणि १२ शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये महिला व बालकांच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.