रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २४ वे मरणोत्तर देहदान
रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २४ वे मरणोत्तर देहदान
काळबादेवीचे ज्येष्ठ नागरिक तुकाराम बनप यांच्या इच्छेनुसार कुटुंबीयांचा पुढाकार
रत्नागिरी : रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २४ वे मरणोत्तर देहदान करण्यात आले. काळबादेवी (ता. रत्नागिरी) येथील ज्येष्ठ नागरिक दिवंगत तुकाराम शंकर बनप (वय ८३) यांनी आपल्या हयातीतच देहदानाची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या निधनानंतर कुटुंबीयांनी त्यांच्या इच्छेचा आदर करत ६ ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांचा देह वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी व संशोधनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द केला.
दिवंगत तुकाराम बनप यांनी २९ जानेवारी २०२५ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे मरणोत्तर देहदानाचे इच्छापत्र सादर केले होते. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी अल्पशा आजाराने शासकीय रुग्णालयात त्यांचे निधन झाले. त्यानंतर कुटुंबीयांनी कोणताही विलंब न करता त्यांच्या उदात्त इच्छेचा सन्मान करत देहदानाची प्रक्रिया पूर्ण केली.
तुकाराम बनप यांनी जी. एम. शेट्ये हायस्कूल, बसणी येथे मुख्य लिपिक म्हणून प्रदीर्घ काळ सेवा बजावली होती. काळबादेवी गावातील सामाजिक सलोखा आणि एकोपा टिकवून ठेवण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. आपल्या वाडीतील विविध घटकांना एकत्र बांधून ठेवत त्यांनी निःस्वार्थ भावनेने समाजकार्य केले.
जगाचा निरोप घेतानाही समाजाच्या कल्याणासाठी देहदान करून त्यांनी परोपकाराचा आदर्श निर्माण केला, अशी भावना काळबादेवी येथील ज्येष्ठ ग्रामस्थ अशोक मयेकर यांनी व्यक्त केली.
वैद्यकीय क्षेत्राशी जोडला गेला अनोखा ऋणानुबंध
बनप कुटुंबीयांचा वैद्यकीय क्षेत्राशी एक अनोखा ऋणानुबंधही यानिमित्ताने जोडला गेला आहे. दिवंगत तुकाराम बनप यांची नात कु. पायल मिलिंद बनप हिने नुकतीच BHMS अंतिम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण होऊन वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. नात वैद्यकीय पदवीधर होत असतानाच आजोबांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देहदान केल्याने या कुटुंबाची ही सामाजिक बांधिलकी विशेष ठरली आहे.
या वेळी बनप यांचे सुपुत्र मिलिंद, प्रीतम व प्रशांत बनप, सुना, नातवंडे आणि आप्तस्वकीय उपस्थित होते. तसेच बसणी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे सचिव बापू गवाणकर, सदस्य संजय वारेकर, मारुती मयेकर, काळबादेवीतील सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण मयेकर, रवी सुर्वे, जयवंत मयेकर, बंड्या पेटकर, विनय मयेकर, विवेक मयेकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांनी कै. तुकाराम बनप यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
देहदानाची प्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव तसेच पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, प्रियल आडीवरेकर, मिथिलेश मुरकर, मिहीर मुरकर, मिहीर लोंढे, श्रेयश जोशी, राज पेडणेकर आणि वाहन चालक प्रीतम भोसले यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली.