शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी सर्वांनी समर्पित भावनेने काम करावे - दादाजी भुसे
शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी सर्वांनी समर्पित भावनेने काम करावे – दादाजी भुसे
‘चला जाऊया शाळेत’ अभियानाचा सिंधुदुर्गात आढावा; सहा शाळांना मंत्री भुसे यांची भेट
सिंधुदुर्ग, दि. ७ :
जिल्ह्यातील शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्तेत निश्चित आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी शिक्षक, अधिकारी, पालक, लोकप्रतिनिधी आणि समाजातील सर्व घटकांनी समर्पित भावनेने काम करावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच आवश्यक भौतिक सुविधा, संस्कार, शिस्त आणि कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध करून देत सक्षम आणि राष्ट्रभक्त नागरिक घडविण्यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित ‘चला जाऊया शाळेत’ अभियानाच्या आढावा बैठकीत मंत्री भुसे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षक, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
शाळांमधील किरकोळ दुरुस्ती, रंगरंगोटी आणि आवश्यक कामांसाठी मंत्रालयीन मंजुरीची प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी शाळेच्या पटसंख्येनुसार शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांच्या खात्यावर थेट निधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे भुसे यांनी सांगितले. तसेच शुद्ध पाणी, स्वच्छतागृहे, सुस्थितीतील शालेय इमारती, वाचनालय आणि क्रीडांगण यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीत वाढ करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘सायन्स सेंटर’ उभारण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री भुसे यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्याने विद्यार्थी आधार व्हॅलिडेशन आणि आधार आयडीच्या कामात राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांनी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले.
‘चला जाऊया शाळेत’ अभियानांतर्गत मंत्री भुसे यांनी जिल्ह्यातील सहा शाळांना भेटी देऊन तेथील शैक्षणिक गुणवत्ता आणि उपलब्ध सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. पुढील सहा महिन्यांत सात अधीक्षक, पाच गटशिक्षणाधिकारी आणि २९ विस्तार अधिकारी यांची रिक्त पदे भरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील २३० वर्गखोल्या आणि २२१ क्रीडांगणांचा अनुशेष दूर करण्यासाठीही उपाययोजना करण्यात येणार आहेत.
सर्व प्रकारच्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आधुनिक सुविधा निर्माण करणे ही केवळ शिक्षण विभागाची नव्हे, तर समाजातील सर्व घटकांची सामूहिक जबाबदारी आहे, असेही भुसे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, स्वच्छता व हरित विद्यालय मूल्यांकनात सिंधुदुर्ग जिल्ह्याने ९२ टक्के गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांनी दिली.