सफाई कामगारांना शासकीय योजनांचे लाभ प्राधान्याने द्या – शेरसिंग डागोर

0
13
सफाई कामगारांना शासकीय योजनांचे लाभ प्राधान्याने द्या - शेरसिंग डागोर
सफाई कामगारांना शासकीय योजनांचे लाभ प्राधान्याने द्या - शेरसिंग डागोर

सफाई कामगारांना शासकीय योजनांचे लाभ प्राधान्याने द्या – शेरसिंग डागोर

निवासस्थाने, शिष्यवृत्ती, सायकली व निवृत्तीविषयक लाभांसाठी तीन महिन्यांत कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश

सिंधुदुर्ग :
जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काने निवासस्थाने उपलब्ध करून देणे, त्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती व सायकली देणे, निवृत्तीच्या दिवशीच सर्व निवृत्तीविषयक लाभ प्रदान करणे, समाजगृहे उपलब्ध करून देणे, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही येत्या तीन महिन्यांत पूर्ण करावी, असे निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सुरंगी सभागृहात हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करणे अधिनियम, २०१३ च्या अंमलबजावणीसह सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि त्यांच्या निराकरणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासूर, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांच्यासह नगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस व विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
वारसांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया गतिमान करा
बैठकीत अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी सफाई कर्मचाऱ्यांची मंजूर, भरलेली व रिक्त पदे, तसेच नियमित आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या याबाबत सविस्तर माहिती घेतली. सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्ती देण्यासंदर्भातील शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी. लाड-पागे समितीच्या शिफारसींनुसार वारसाहक्काने नियुक्त्या देण्याची प्रक्रिया गतिमान करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी करून गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आवश्यक मदत उपलब्ध करून द्यावी. प्रत्येक सफाई कर्मचाऱ्याकडे आभा (ABHA) कार्ड असल्याची खात्री करून त्यांना कार्डची प्रत उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आरोग्य, सुरक्षितता आणि स्वयंरोजगारावर भर
सफाई कर्मचारी समाजाच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या कामाचे स्वरूप आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन सर्व विभागांनी मानवतावादी दृष्टिकोनातून त्यांच्या आरोग्याची, सुरक्षिततेची आणि जीवनमान उंचावण्याची काळजी घ्यावी, असे डागोर यांनी सांगितले.
सफाई कर्मचाऱ्यांसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करून विविध शासकीय योजनांचे लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून द्यावेत. तसेच त्यांच्यासाठी असलेल्या स्वयंरोजगाराच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
निवृत्तीच्या दिवशीच सर्व लाभ देण्याचे निर्देश
निवृत्त होणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या दिवशीच भविष्य निर्वाह निधी (पीएफ), उपदान आणि रजा रोखीकरणासह सर्व देय लाभ मिळणे आवश्यक आहे. यासाठी निवृत्तीपूर्वीच प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करावी. सफाई कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे निर्णय वेळेत घ्यावेत आणि २०२४ च्या शासन निर्णयानुसार लाड-पागे समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी करावी, असेही अध्यक्षांनी सांगितले.
दोन महिन्यांत प्रलंबित प्रश्न सोडविणार
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांच्या निराकरणासाठी समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करून आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले. पुढील दोन महिन्यांत प्रलंबित कामांचा निपटारा करून त्याचा आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, तीन महिन्यांनंतर सर्व संबंधित मुख्याधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात येणार असल्याचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here