पंढरपूर वारीवरील माहितीपटाची ‘एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स २०२६’मध्ये राष्ट्रीय विजेता म्हणून निवड

0
14
पंढरपूर वारीवरील माहितीपटाची ‘एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स २०२६’मध्ये राष्ट्रीय विजेता म्हणून निवड
पंढरपूर वारीवरील माहितीपटाची ‘एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स २०२६’मध्ये राष्ट्रीय विजेता म्हणून निवड

पंढरपूर वारीवरील माहितीपटाची ‘एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स २०२६’मध्ये राष्ट्रीय विजेता म्हणून निवड

‘सर्वोत्कृष्ट ब्रँडेड कार्यक्रम’ श्रेणीत भारताचा बहुमान; महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा जागतिक स्तरावर गौरव

मुंबई, प्रतिनिधी :
महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडविणाऱ्या ‘पंढरपूर वारी – इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स’ या माहितीपटाची प्रतिष्ठित ‘एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स २०२६’मध्ये ‘सर्वोत्कृष्ट ब्रँडेड कार्यक्रम’ श्रेणीत भारताचा राष्ट्रीय विजेता म्हणून निवड झाली आहे. माहिती व जनसंपर्क विभागामार्फत निर्मित या माहितीपटाच्या यशामुळे महाराष्ट्राच्या समृद्ध भक्तिपरंपरेला जागतिक व्यासपीठावर विशेष स्थान मिळाले आहे.
महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेल्या पंढरपूर आषाढी वारीची समृद्ध परंपरा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली. माहिती व जनसंपर्क विभाग आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या या माहितीपटाचे डिस्कव्हरीच्या जगभरातील विविध वाहिन्यांवरून प्रसारण करण्यात आले आहे.
सुमारे २२ मिनिटांच्या इंग्रजी भाषेतील या माहितीपटातून महाराष्ट्राची संतपरंपरा, वारकरी संप्रदाय आणि शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या पंढरपूर वारीचे महत्त्व जागतिक प्रेक्षकांसमोर मांडण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांनी दिलेला भक्ती, समता, मानवता आणि बंधुभावाचा संदेश भाषेच्या सीमा ओलांडून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यात या माहितीपटाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील विविध देशांमधून सादर झालेल्या दर्जेदार निर्मितींमधून या माहितीपटाची भारताचा राष्ट्रीय विजेता म्हणून निवड झाली. या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती व जनसंपर्क विभाग आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांचे अभिनंदन केले. तसेच महाराष्ट्राच्या वारी परंपरेचा गौरव जगासमोर मांडणारा हा माहितीपट सर्वांनी पाहावा, असे आवाहन केले.
या पुरस्कारामुळे महाराष्ट्राची भक्तिपरंपरा, संतसाहित्य, सामाजिक समतेचा विचार आणि वारीची वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक परंपरा आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाली आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाची जागतिक ओळख अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हा बहुमान महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
— ब्रिजेश सिंह, प्रधान सचिव व महासंचालक, माहिती व जनसंपर्क विभाग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here