लोकशाहीच्या रक्षणासाठी मनसेचे वाशी रेल्वे स्थानकावर स्वाक्षरी आंदोलन.png
लोकशाहीच्या रक्षणासाठी मनसेचे वाशी रेल्वे स्थानकावर स्वाक्षरी आंदोलन
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासह विविध मागण्या; मनसे प्रवक्ते गजानन काळे यांचे नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
नवी मुंबई :
निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता वाढविण्यासह लोकशाही व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कायम राखण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्यभर स्वाक्षरी आंदोलन राबविण्यात येत आहे. या आंदोलनांतर्गत सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकावर स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा, राबविण्यात आलेली एसआयआर (SIR) प्रक्रिया पूर्णपणे रद्द करणे, मतदानासाठी बॅलेट पेपरचा वापर करून ईव्हीएमला पर्याय उपलब्ध करून देणे, स्वच्छ व पारदर्शक मतदार याद्या तयार करणे आणि सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन निवडणूक प्रक्रिया राबविणे, या प्रमुख मागण्या मनसेने मांडल्या आहेत.
निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि निष्पक्षता सुनिश्चित करण्यासाठी हे आंदोलन सुरू असल्याचे मनसेचे राज्य प्रवक्ते आणि नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी सांगितले. लोकशाहीचे रक्षण, निष्पक्ष निवडणुका आणि नागरिकांच्या मताधिकाराचा सन्मान यासाठी नागरिकांनी या स्वाक्षरी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.