सिंधुदुर्गातील आणखी ९५३ आंबा-काजू बागायतदारांना १ कोटी ३५ लाखांची नुकसानभरपाई
आतापर्यंत २९ हजार ३०८ शेतकऱ्यांच्या खात्यावर ६४.५३ कोटी रुपये जमा; ई-केवायसी आणि आधार संलग्नता पूर्ण करण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू पिकांच्या नुकसानीपोटी बागायतदारांना नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरू असून, नव्याने आणखी ९५३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर एकूण १ कोटी ३५ लाख ५० रुपये जमा करण्यात आले आहेत. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत नुकसानभरपाई मिळालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या २९ हजार ३०८ झाली आहे.
जिल्ह्यात आंबा आणि काजू पिकांच्या नुकसानीपोटी एकूण ३४ हजार ९३९ लाभार्थी शेतकऱ्यांसाठी ७५ कोटी ९४ लाख १९ हजार ९८४ रुपयांच्या निधीला पोर्टलद्वारे मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंत २९ हजार ३०८ शेतकऱ्यांना एकूण ६४ कोटी ५३ लाख ४ हजार ८४६ रुपयांची नुकसानभरपाई मिळाली आहे.
ई-केवायसीअभावी भरपाई वितरण प्रलंबित
उर्वरित पात्र लाभार्थ्यांना नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरू आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, २ हजार २१२ लाभार्थी शेतकऱ्यांची ४ कोटी ४१ लाख ४४ हजार रुपयांची नुकसानभरपाई ई-केवायसी प्रलंबित असल्यामुळे वितरित झालेली नाही.
शेतकऱ्यांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी
नुकसानभरपाईची रक्कम थेट बँक खात्यावर जमा होण्यासाठी संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे तसेच बँक खाते आणि आधार यांची संलग्नता योग्य असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
त्यासाठी प्रलंबित लाभार्थ्यांनी संबंधित तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय किंवा जवळच्या महा-ई-सेवा केंद्राशी संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
आंबा आणि काजू बागायतदारांनी नुकसानभरपाई मिळण्यात अडथळा येऊ नये यासाठी प्रलंबित कागदपत्रे आणि ई-केवायसीची पूर्तता वेळेत करणे आवश्यक आहे.