कुडाळ तालुक्यातील आंबेरी गावाचा वाडोस माणगाव मंडळात मध्ये समावेश

0
11
कुडाळ तालुक्यातील आंबेरी गावाचा वाडोस तलाठी साझात समावेश
कुडाळ तालुक्यातील आंबेरी गावाचा वाडोस तलाठी साझात समावेश

कुडाळ तालुक्यातील आंबेरी गावाचा वाडोस माणगाव मंडळात मध्ये समावेश

महसूल मंडळ पुनर्रचनेअंतर्गत अंतिम अधिसूचना जारी; आंबेरी गावाचा गोठोसऐवजी माणगाव महसूल मंडळात समावेश

कुडाळ प्रतिनिधी :
कुडाळ तालुक्यातील महसूल मंडळांच्या पुनर्रचनेअंतर्गत आंबेरी गावाचा तुळसुली-कर्याद-नारूर तलाठी साझातून माणगाव महसूल मंडळातील वाडोस तलाठी साझामध्ये समावेश करण्यात आला आहे. सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी अंतिम अधिसूचनेद्वारे या बदलास मान्यता दिली आहे. त्यामुळे आंबेरी गावाचा गोठोस महसूल मंडळातून माणगाव महसूल मंडळात समावेश झाला आहे.
महसूल यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी पुनर्रचना
राज्यात वाढती लोकसंख्या आणि नागरीकरणामुळे महसूल यंत्रणेवरील कामाचा ताण वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने तलाठी साझे आणि महसूल मंडळांच्या पुनर्रचनेचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वी अस्तित्वात असलेल्या २३६ तलाठी साझांमध्ये ९९ नवीन साझांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तलाठी साझांची एकूण संख्या ३३५ झाली असून, ५७ महसूल मंडळे निर्माण करण्यात आली आहेत.
ग्रामस्थांच्या सोयीचा विचार
कुडाळच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार आंबेरी गावाचा वाडोस तलाठी साझामध्ये समावेश करणे ग्रामस्थांच्या सोयीचे ठरणार आहे. तलाठी साझाचे मुख्यालय आणि त्यास संलग्न गाव यांमधील अंतर, उपलब्ध दळणवळण व्यवस्था तसेच स्थानिक नागरिकांची सोय या बाबींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ मधील कलम ४ च्या पोटकलम (२) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी ही अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचना उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, संबंधित तलाठी साझा आणि ग्रामपंचायत कार्यालयांच्या सूचना फलकांवर प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या प्रशासकीय बदलामुळे आंबेरी गावातील नागरिकांना महसुली कामकाजासाठी अधिक सोयीची व्यवस्था उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here