![shasan [18:03, 17/10/2026] Lalit Salunke: उपस्थित होते. [18:06, 17/10/2026] Lalit Salunke: हिंदू खाटीक समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध स्वयंरोजगार कर्ज योजना](https://sindhudurgsamachar.in/wp-content/uploads/2026/10/shasan.jpeg)
हिंदू खाटीक समाजासाठी स्वयंरोजगार कर्ज योजनांची संधी; पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करावेत
५० टक्क्यांपर्यंत अनुदानासह विविध योजना; रत्नागिरी जिल्हा व्यवस्थापकांचे आवाहन
रत्नागिरी :
हिंदू खाटीक समाजातील नागरिकांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसह सर्वांगीण विकासासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळांतर्गत कार्यरत असलेल्या ‘हिंदू खाटीक समाज आर्थिक महामंडळ मर्या.’ यांच्या माध्यमातून विविध स्वयंरोजगार कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या पात्र नागरिकांनी अर्ज करावेत, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.
स्वयंरोजगारासाठी विविध योजना
५० टक्के अनुदान योजना : या योजनेंतर्गत कमाल ५० हजार रुपयांच्या प्रकल्पासाठी प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त २५ हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. उर्वरित रक्कम बँकेमार्फत नियमानुसार व्याजदराने कर्जस्वरूपात उपलब्ध होते. कर्जाची परतफेड तीन वर्षांत करावी लागते.
बीज भांडवल योजना : ५०,००१ ते पाच लाख रुपयांपर्यंतच्या प्रकल्पांसाठी ही योजना उपलब्ध आहे. यामध्ये ७५ टक्के बँक कर्ज, २० टक्के महामंडळाचे बीजभांडवल कर्ज आणि पाच टक्के अर्जदाराचा स्वहिस्सा अशी आर्थिक रचना आहे. बीजभांडवल कर्जावर वार्षिक चार टक्के व्याजदर आकारला जातो. या योजनेत कमाल ५० हजार रुपयांपर्यंतच्या अनुदानाचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे. परतफेड तीन ते पाच वर्षांच्या कालावधीत समान मासिक हप्त्यांनी करावी लागते.
थेट कर्ज योजना : या योजनेंतर्गत कमाल एक लाख रुपयांपर्यंतच्या प्रकल्पासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. यामध्ये ५० टक्के, म्हणजेच कमाल ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान, तर उर्वरित ५० हजार रुपये महामंडळामार्फत वार्षिक चार टक्के व्याजदराने कर्जस्वरूपात दिले जातात. कर्जाची परतफेड सर्वसाधारणपणे तीन वर्षांत करावी लागते.
एनएसएफडीसी (NSFDC) योजना : या योजनेंतर्गत कमाल एक लाख ४० हजार रुपयांपर्यंतच्या प्रकल्पासाठी एकूण प्रकल्प खर्चाच्या ९० टक्क्यांपर्यंत आर्थिक सहाय्य उपलब्ध होऊ शकते. यामध्ये एनएसएफडीसी, नवी दिल्ली यांच्यामार्फत कमाल ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान, तर उर्वरित रक्कम बीजभांडवल स्वरूपात दिली जाते. या योजनेसाठी अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
पात्रतेचे निकष
-
अर्जदार अनुसूचित जातीतील हिंदू खाटीक समाजाचा असावा.
-
वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे.
-
ग्रामीण व शहरी भागातील कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे.
-
अर्जदार महामंडळाच्या कोणत्याही राज्यस्तरीय अथवा केंद्रस्तरीय योजनेचा थकबाकीदार नसावा.

