७२.६८ लाख रुपये खर्चून उभारली आधुनिक इमारत; पशुधनाच्या आरोग्यसेवांना मिळणार बळकटी
दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथील राज्यस्तरीय श्रेणी-१ पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नूतन इमारतीचे लोकार्पण राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या नव्या इमारतीमुळे परिसरातील पशुपालकांना पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत.
या इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी यांच्या माध्यमातून करण्यात आले असून, त्यासाठी ७२ लाख ६८ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर २८ मे २०२६ रोजी या इमारतीचे हस्तांतरण करण्यात आले होते. आता या सुविधेमुळे दोडामार्ग तालुक्यातील पशुधनाच्या आरोग्यसेवांना अधिक बळकटी मिळण्यास मदत होणार आहे.
पशुधन हे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असून, पशुपालकांना वेळेवर आणि दर्जेदार पशुवैद्यकीय सेवा मिळणे आवश्यक आहे. या दवाखान्याच्या नूतन इमारतीमुळे पशुधनाच्या उपचारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे परिसरातील पशुपालकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
या लोकार्पण सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापती पार्वती गवस, सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी वीरसिंग वसावे, पशुसंवर्धन उपायुक्त समीर बिलोलीकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले, दोडामार्गचे तहसीलदार राहुल गुरव आणि सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी सीमा गोवेकर यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.