संत समाज दोडामार्गच्या वतीने आंबेली येथे सामूहिक कुमकुमार्चन भक्तिभावात संपन्न

0
7
संत समाज दोडामार्गच्या वतीने आंबेली येथे सामूहिक कुमकुमार्चन भक्तिभावात संपन्न
संत समाज दोडामार्गच्या वतीने आंबेली येथे सामूहिक कुमकुमार्चन भक्तिभावात संपन्न

संत समाज दोडामार्गच्या वतीने आंबेली येथे सामूहिक कुमकुमार्चन भक्तिभावात संपन्न

दोडामार्ग – प्रतिनिधी
परमपूज्य सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामी महाराज यांच्या गुरुपीठारोहण रजतमहोत्सवी वर्षानिमित्त श्री दत्त पद्मनाभ पीठ, श्री क्षेत्र तपोभूमी, गोवा संचालित संत समाज, दोडामार्ग यांच्या वतीने शुक्रवारी श्री सातेरी सिद्धनाथ मंदिर, आंबेली येथे सामूहिक कुमकुमार्चन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तपोभूमीतील ब्रह्मवृंदांच्या पौरोहित्याखाली हा धार्मिक सोहळा अत्यंत भक्तिभावात आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या सामूहिक कुमकुमार्चन सोहळ्यामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. धार्मिक परंपरांचे जतन व संवर्धन करणे, सामूहिक उपासनेच्या माध्यमातून भक्तिभाव वृद्धिंगत करणे आणि समाजात आध्यात्मिक जागृती निर्माण करणे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कुमकुमार्चनात उत्स्फूर्त सहभाग घेतला. या प्रसंगी वेदमूर्ती विष्णुजी आणि वेदमूर्ती सुधाकरजी यांनी धार्मिक विधी व पूजाविधी पार पाडले. कार्यक्रमाच्या प्रारंभी संत समाज दोडामार्गचे अध्यक्ष श्री. सुभाष गवंडे यांनी प्रास्ताविकातून आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. तसेच श्री. विठोबा उर्फ दादा पालयेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामी महाराज यांच्या गुरुपीठारोहण रजतमहोत्सवी वर्षानिमित्त संत समाजाच्या वतीने विविध धार्मिक व आध्यात्मिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.
या उपक्रमांतून धार्मिक संस्कारांचे संवर्धन, सामूहिक उपासनेची परंपरा आणि समाजातील आध्यात्मिक एकात्मता अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सोहळ्यास संत समाज दोडामार्ग समितीचे पदाधिकारी तसेच दोडामार्ग परिसरातील ग्रामस्थ आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सामूहिक कुमकुमार्चन कार्यक्रम भक्तिमय वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिया नाईक यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here