महाराष्ट्रातील सहा युवा कलावंतांना ‘उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार’

0
6
महाराष्ट्रातील सहा युवा कलावंतांना ‘उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार’
महाराष्ट्रातील सहा युवा कलावंतांना ‘उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार’

महाराष्ट्रातील सहा युवा कलावंतांना ‘उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार’

राष्ट्रीय स्तरावर मराठी कलापरंपरांचा गौरव

महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला असून, राज्यातील सहा युवा कलावंतांना संगीत नाटक अकादमीच्या प्रतिष्ठित ‘उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आले आहे. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, भारूड, पारंपरिक बाहुलीनाट्य, हार्मोनियम वादन, शाहिरी, पोवाडा आणि लोकगीत अशा विविध कलाप्रकारांत योगदान देणाऱ्या या कलावंतांच्या सन्मानामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाला राष्ट्रीय व्यासपीठावर नवी ओळख मिळाली आहे.

केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे झालेल्या समारंभात सन २०२४ आणि २०२५ या वर्षांसाठी देशभरातील एकूण १०६ युवा कलावंतांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्कारांत २५ हजार रुपये रोख, ताम्रपट आणि अंगवस्त्र देऊन कलावंतांचा गौरव केला जातो. युवा प्रतिभेला प्रोत्साहन देणे, पारंपरिक कलांचे जतन व संवर्धन करणे आणि भारतीय कला-संस्कृतीचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हा या पुरस्कारांचा प्रमुख उद्देश आहे.

हिंदुस्तानी शास्त्रीय गायनातील योगदानाबद्दल कृष्ण बोंगाने आणि अंकिता जोशी यांना सन २०२४ चा संयुक्त युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पारंपरिक ‘बहुरूपी भारूड’ या लोककलाप्रकाराच्या संवर्धनासाठी डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे यांना, तर पारंपरिक कलासूत्री बाहुलीनाट्य कलेच्या जतन आणि संवर्धनासाठी बालकृष्ण (कृष्णा) गणपत मसगे यांना सन २०२४ चा युवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सन २०२५ च्या पुरस्कारांमध्ये हार्मोनियम वादनातील योगदानाबद्दल तन्मय देवचके यांना, तर शाहिरी, पोवाडा आणि लोकगीतांचा अभ्यास, संशोधन व प्रसार यासाठी प्रवीण प्रताप जाधव यांना गौरविण्यात आले. तन्मय देवचके हे पुरस्कार वितरण समारंभास उपस्थित नव्हते.
महाराष्ट्रातील या सहा युवा कलावंतांचा सन्मान म्हणजे राज्याच्या विविध कलापरंपरांना मिळालेली राष्ट्रीय पातळीवरील दाद आहे. पारंपरिक लोककला आणि शास्त्रीय संगीत यांचा वारसा जपणाऱ्या नव्या पिढीतील कलावंतांसाठी हा गौरव निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here