रत्नागिरीत दुर्गादेवी विसर्जनासाठी वाहतुकीत बदल,मांडवी चौपाटीकडे जाणारा मार्ग बंद

0
7
रत्नागिरीत दुर्गादेवी विसर्जनासाठी वाहतुकीत बदल
रत्नागिरीत दुर्गादेवी विसर्जनासाठी वाहतुकीत बदल

रत्नागिरीत दुर्गादेवी विसर्जनासाठी वाहतुकीत बदल,मांडवी चौपाटीकडे जाणारा मार्ग बंद

पर्यायी मार्ग जाहीर

रत्नागिरी :
दुर्गादेवी मूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातील मांडवी चौपाटी परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी जारी केले आहेत. हे वाहतूक नियंत्रण आदेश २० आणि २१ ऑक्टोबर रोजी दुपारी २ ते रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांडवी समुद्रकिनारी दुर्गादेवी मूर्ती विसर्जनासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. विसर्जनासाठी अंदाजे ५ ते ६ हजार नागरिक येण्याचा अंदाज असल्याने वाहतूक कोंडी टाळणे, पार्किंगची समस्या नियंत्रणात ठेवणे आणि कायदा व सुव्यवस्था राखणे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
मांडवी चौपाटीकडे जाणारा मार्ग बंद
वाहतूक नियंत्रण आदेशानुसार, भुतेनाका ते भडंगतिठा मार्गे मांडवीकडे जाणारा रस्ता सर्वसामान्य वाहनांसाठी पूर्णतः बंद राहणार आहे. मांडवी समुद्रकिनारा ते नाईक फॅक्टरी या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे.
वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग
बंद करण्यात आलेल्या मार्गाऐवजी वाहनचालकांना भुतेनाका – मिरकरवाडा तिठा – मत्स्यालय – नाईक फॅक्टरी या पर्यायी मार्गाचा वापर करता येईल.
मांडवी चौपाटीपर्यंत केवळ दुर्गादेवी मूर्ती विसर्जनासाठी येणाऱ्या वाहनांनाच प्रवेश दिला जाणार आहे. इतर खासगी तसेच प्रवासी वाहनांना समुद्रकिनारी प्रवेश बंद राहणार आहे.
अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना सवलत
पोलीस वाहने, अग्निशामक दलाची वाहने, रुग्णवाहिका, शासकीय वाहने तसेच मंत्र्यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने पोलिसांनी अधिकृत परवानगी दिलेल्या वाहनांना या वाहतूक नियंत्रणातून सवलत देण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत घटनास्थळी तैनात असलेले पोलीस अधिकारी परिस्थितीनुसार आवश्यक निर्णय घेतील.
वाहतूक बदलांबाबत वाहनचालक, वाहनमालक किंवा नागरिकांना काही आक्षेप अथवा हरकती असल्यास त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे नोंदवाव्यात, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दुर्गादेवी विसर्जनासाठी मांडवी चौपाटीकडे जाणाऱ्या नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here